जाकादेवी वार्ताहर :
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत खालगाव- जाकादेवी परिसरात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा रत्नागिरी व खालगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने खालगाव-जाकादेवी परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
सर्वप्रथम संत निरंकारी मिशनचे तालुका मुखी रमाकांत खांबे, मुंबईचे सेवादल शिक्षक साईनाथ रामगडे यांनी संत निरंकारी मिशनचे ध्येय व उद्दिष्टे विशद केली. स्वच्छता हे परमेश्वरी कार्य आहे. मानवाची सेवा करण्यासाठी निरंकारी मिशन सदैव कार्यरत आहे. मानवाला निरोगी राहण्यासाठी स्वच्छता ही अनिवार्य असल्याचे रमाकांत खांबे व साईनाथ रामगडे यांनी सांगितले. यावेळी सेवाभावी वृत्तीने कार्यरत असलेल्या निरंकारी मिशनचे कार्यकर्ते व सेवाभावी मान्यवर पदाधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या स्वच्छता अभियानात सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर, सेवादलाचे शिक्षक राजू माने, विलास सखाराम धामणे, ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा रामगडे, प्रकाश गोताड, चंद्रकांत जाधव, तेजस्विनी कुळ्ये, दीपक कातकर, विनया गोताड, उमा देसाई, प्रिया महाडिक यांसह पोलीस पाटील प्रकाश जाधव तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व पंचक्रोशीतील संत निरंकारी मिशनचे साधक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रारंभी संत निरंकारी मिशनची संकल्पना रमाकांत खांबे, साईनाथ रामगड यांनी विशद केल्यानंतर खालगाव जाकादेवी परिसरामध्ये प्रत्यक्ष महिला-पुरुष या साधकांनी अतिशय कर्तव्य भावनेतून परिसरातील स्वच्छता मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन परिसर स्वच्छ करण्यात मोलाची कामगिरी केली.
या निरंकारी मिशनच्या सेवाभावी मानवतावादी कार्याचे सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर यांनी कौतुक करून या निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला धन्यवाद दिले. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी निरंकारी मिशनचे सर्व साधक व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनी मेहनत घेतली