(चिपळूण /ओंकार रेळेकर)
चिपळूण तालुक्यातील कापसाळ गावच्या ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेत खेर्डी जि.प गटातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हा पुरस्कार संपूर्ण कापसाळ ग्रामस्थांच्या यशाचे फलित असल्याचे कापसाळ गावचे सरपंच सुनील गोरीवले यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय पाणी स्वच्छता व सहाय्य संस्था बेलापूर नवी मुंबई व जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या अंतर्गत २०२०-२१ व सन २०२१-२२ सालच्या घेण्यात झालेल्या खेर्डी जि.प गट अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये केवळ चिपळूण तालुक्यातून कापसाळ ग्रामपंचातिने स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. प्रशस्तीपत्र आणि पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देऊन कापसाळ ग्रामपंचायतला सोमवार दि.२४ एप्रिल २०२३ रोजी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या उपस्थिती मध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तिकुमार पुजार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या वेळी गटविकास अधिकारी उमा पाटील ,गुहागरचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत,प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, ग्रामविकास अधिकारी महादेव सुर्वे,उपसरपंच सचिन नाचणकर आदी उपस्थित होते. कापसाळ गावच्या प्रत्येक लोकहिताच्या कामात कापसाळ गावातील सर्व ग्रामस्थांचा नेहमी सहकार्याचा हात असतो विकास कामात गाव एका हातावर असल्यामुळे सर्वांच्या सहकार्यानेच हा पुरस्कार मिळाला आहे. ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ,उपसरपंच ग्रामविकास अधिकारी, आजी माजी सरपंच, गावचे आजी माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष, पोलीस पाटील ,आरोग्य कर्मचारी ,प्राथमिक शाळा शिक्षक ,अंगणवाडी, आशा सेविका, महिला बचत गट या सर्वांचा हा पुरस्कार मिळविण्यात मोठा सिंहाचा वाटा आहे.हा पुरस्कार एकट्या ग्रामपंचायतीचा नसून कापसाळ गावच्या प्रत्येक ग्रामस्थांच्या नावाचा पुरस्कार आहे.अशी प्रतिक्रिया कापसाळ गावचे सरपंच सुनील गोरीवले यांनी बुधवारी येथे ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पुरस्कार मिळविण्याच्या स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील खेर्डी जिल्हा परिषद गटामधून कामथे खुर्द, कांमथे बुद्रुक, खेर्डी, धामणवणे, मिरजोळी, कापसाळ या ग्रामपंचायतीने सहभाग नोंदविला होता. गटारे स्वच्छता ,सांडपाण्याचे योग्य नियोजन, घनकचरा विल्हेवाट, गावच्या रस्त्यावरील स्वच्छता, पाळीव प्राण्यांचे योग्य संगोपन या सर्व क्षेत्रात कापसाळ ग्रामपंचातीने शासनाच्या अपेक्षित अटी आणि नियमांचे पालन करीत अभिप्रेत अशी जोरदार स्वच्छता मोहीम गावात राबवली. यामुळेच ग्रामपंचायत प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराची मानकरी ठरली अशी प्रतिक्रिया ग्रामपंचातीचे ग्रामविकास अधिकारी महादेव सुर्वे यांनी व्यक्त केली.
सरपंच सुनील गोरीवले, उपसरपंच सचिन नाचणकर, सदस्य दिनेश तांबडे, अजित साळवी, प्रकाश डीघे, रश्मी साळवी, श्रुती कांबळी, वेदिका गोरीवले, जिया कांबळी, श्रुती शिंदे, सुहासिनी रहाटे ग्रामविकास अधिकारी महादेव सुर्वे, प्रकाश साळवी, निलेश ठसाळे, अक्षय शिंदे, तलाठी महेश कोकाटे, शांताराम येडगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आम्हाला ज्या वेळेला शासनाचे परिपत्रक प्राप्त झाले त्यावेळेला घनकचरा, सांडपाणी या गोष्टीवर गावाने भर दिली. येथील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही परिश्रम घेतले गावात पाच जॅकवेल आहेत व अंतर्गत विहिरी आहेत. त्या साफ करण्याचा दरवर्षी आम्ही प्रयत्न करतो तसेच सर्व सदस्यांच्या वतीने मी नाम फाउंडेशन चे विशेष आभार मानतो. आम्ही २०२१ रोजी ग्रामपंचायत मध्ये पदभार स्वीकारला. यानंतर नाम फाउंडेशनकडे आम्ही विनंती केली त्यांनी तात्काळ आमच्या विनंतीला मान देऊन कापसाळ धरण ते शिवनदी पर्यंतचे किमान चार किमीचे अंतरावरील गाळ साफ करून अंदाजे एक कोटी रुपयांचा निधी गावासाठी खर्च केला. यात सर्वात प्रथम नाम फाउंडेशनने नदीचे पात्र साफ केले विहिरी साफ करण्यासाठी प्रयत्न केले याबद्दल कापसाळगावचा सरपंच या नात्याने गावचे सर्व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यावतीने मी नाम फाउंडेशनचे अध्यक्ष अभिनेते नाना पाटेकर, समीर जानवरकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो असे सांगून दरवर्षी आम्ही प्रत्येक ठिकाणी जॅकवेल, धोबीघाट अशा ठिकाणी पाणी साठण्यासाठी बंधारे घालतो गावचा विकास करण्यासाठी आम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न करतो आणि गावची आम्हाला चांगल्या प्रकारची साथ लाभते असे सरपंच सुनील गोरिवले यांनी येथे बोलताना सांगितले.
कापसाळ ग्रामपंचायत हद्दीत दोन धरणे आहेत. ही दरवर्षी पाण्याने भरलेली असतात. यापूर्वीचे सरपंच व सर्व सदस्य यांनी धरणातील गाळ काढण्यासाठी चांगले प्रयत्न केले.या नंतर आम्ही नियोजन केले आहे की डीगेवाडी धरण बंधारा पर्यटन स्थळ व्हावे यासाठी मी गेले आठ महिने प्रयत्न करीत आहे त्याकरिता पाटबंधारे विभागाचे श्री .वाजे श्री .खोत यांचे आम्हाला चांगले सहकार्य लाभत आहे.आमच्या मागणी वरून त्यांनी आम्हाला केंद्र सरकार च्या वतीने ८५ लाख रुपये केंद्रशासित अनुदान मंजूर करून दिले आहे असे सरपंच सुनील गोरेवले यांनी सांगितले.
फोटो : जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पूजार ग्रामविकास अधिकारी महादेव सुर्वे यांना प्रशस्तिपत्र देताना तर सरपंच सुनील गोरीवले यांना प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी वृक्ष देऊन सन्मानित केले या वेळी सोबत उपसरपंच सचिन नाचंणकर, गटविकास अधिकारी उमा पाटील, गुहागर गटविकास अधिकारी प्रशांत राऊत छायाचित्रात दिसत आहेत
(छाया : ओंकार रेळेकर)