(मुंबई)
मंत्रिमंडळ विस्तारात सामावून न घेण्यात आल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. मंत्रीपदासाठी संधी न दिल्याने अनेक आमदार शपथविधीलाही उपस्थित राहिले नव्हते. त्यातच आता हळूहळू एकेका आमदाराची नाराजी बाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवल्यानंतर आमदार संजय शिरसाट यांनीही शिंदे गटाला इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आमदार शिरसाट यांच्या अधिकृत ट्विटरवरून ट्विट करण्यात आले, त्यात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कुटुंबप्रमुख असे संबोधले. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचे विधानसभेतील एक भाषणही जोडले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे दिलेले वचन आम्ही पाळतोच आणि दिलेला शब्द खरा करून दाखवतोच, असे म्हणताना दिसत होते. शिरसाट यांच्या या ट्विटनंतर सर्वत्र गदारोळ माजला. मंत्रीपद न दिल्याने शिरसाट यांचा हा शिंदे गटाला इशारा तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगण्यास सुरुवात झाली.
त्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. केवळ ट्विट डिलीट करण्यापर्यंतच न थांबता संजय शिरसाट यांनी याबाबत स्पष्टीकरण देणारे आणखी एक ट्विट केले. त्यात त्यांनी स्पष्ट केले की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत राहणार आहे. काल केलेले ‘ते’ ट्विट मोबाईलच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे झाले, असा खुलासा त्यांनी यावेळी केला. तसेच पुढे त्यांनी नमूद केले की, शिवाय उद्धव ठाकरे आमचे कुटुंबप्रमुख होते. आता नाहीत. आम्ही त्यांना मानही दिला, परंतु त्यांनी आमच्या शब्दाचा मान राखला नाही. कुटुंबप्रमुख म्हणून आमच्या मताचा आदर केला नाही. त्यांनी आमचे ऐकले नाही. आताची जी अवस्था आहे ते पाहून आम्हालाही खेद वाटतो, असेही शिरसाट यावेळी सांगण्यास विसरले नाहीत.
औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट हे शिंदे गटात सामील झाले होते. तरीही त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. मंत्रीपदासाठी वेळेवर अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांची नावे घेण्यात आली. त्यामुळे संजय शिरसाट नाराज असल्याचीही चर्चा आहे. तर या नाराजीतूनच त्यांनी हा इशारा दिल्याचे बोलले जात आहे.