(मुंबई)
आघाडी सरकार सत्तेतून पायउतार होताच काँग्रेसने राज्यात पक्ष संघटन मजबूत करण्यावर आता भर दिला आहे. उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर प्रदेश काँग्रेसने शिर्डीत घेतलेल्या नवसंकल्प कार्यशाळेतील घोषणापत्राची अंमलबाजणी राज्यभर केली जाणार आहे. त्यासाठी राज्यभर १०० दिवसांचा कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या निर्णयाची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपच्या ‘भारत तोडो’ ला काँग्रेस ‘भारत जोडो’ अभियानाच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिर्डी कार्यशाळेसाठी उदयपूर शिबिराच्या धर्तीवर सहा विषयांसाठी सहा गट स्थापन करण्यात आले होते. या सहा गटांनी चर्चा करून त्यांचा अहवाल सादर केला. यातूनच शिर्डी घोषणापत्र व कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे, अशी माहिती पटोले यांनी दिली.
वाढती महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, अग्निपथ, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आवाज उठवणार आहे. राज्यभर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्या-जिल्ह्यात पदयात्रा काढून जनजागृती केली जाणार आहे. तसेच २ ऑक्टोबरपासून ‘भारत जोडो’ अभिनयानही राबविले जाणार आहे. काँग्रेसचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवतानाच केंद्र सरकारच्या अपयशाची माहितीही जनतेला करून दिली जाणार आहे, असे पटोले यांनी सांगितले.