(रत्नागिरी)
संगीत नाटककार, पत्रकार, लेखक, कवि, वक्ता विद्याधर गोखले यांनी मराठी जनमानसात मानाचे स्थान संपादन केलेले बहुरंगी व्यक्तीमत्व. त्यांच्या अंगी असलेल्या अशा अनेक गुणांच्या पुनःप्रत्ययाचा आनंद रसिकांना मिळावा, या उद्देशाने जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानने रंगशारदा प्रतिष्ठानच्या सहकार्याने संपूर्ण वर्षभर कलाकारांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
या जन्मशताब्दी वर्षाच्या शानदार शुभारंग होणार आहे एकाच दिवशी एकाच वेळी या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून. या संकल्पनेअंतर्गत बुधवार दि. ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता खल्वायन रत्नागिरी या संस्थेतर्फे गुरुकृपा मंगल कार्यालयात विद्याधर गीतरंग हा विद्याधर गोखले यांच्या संगीत नाटकांतील नाट्यपदांचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे.
हा कार्यक्रम विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानने प्रायोजित केला असून गोखले यांच्या शाब्बास बिरबल शाब्बास, जय जय गौरीशंकर, सुवर्णतुला, बावनखणी, मेघमल्हार, स्वरसम्राज्ञी, मंदारमाला, मदनाची मंजिरी, पंडितराज जगन्नाथ या नाटकातील नाट्यपदांनी हा कार्यक्रम रंगणार आहे. चैतन्य गोडबोले, वरद केळकर, सौ. श्वेता जोगळेकर, सौ. स्मिता करंदीकर हे नामवंत कलाकार आपल्या दमदार आवाजाने विद्याधर गोखले यांच्या नाट्यपदांना न्याय देणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला तबलासाथ हेरंब जोगळेकर, हार्मोनियम अमित ओक, ऑर्गन बालकलाकार श्रीरंग जोगळेकर भारदस्तपणे करणार आहेत. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण व रंगतदार निवेदन सौ. दीप्ती कानविंदे, प्रदीप तेंडुलकर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनाशुल्क आहे. ४ जानेवारीला एकाच दिवशी महाराष्ट्रातील रत्नागिरी, दादर, मुंबई, नाशिक, सांगली, नांदेड, पणजी, कुडाळ, पुणे, मुलुंड, अमरावती या दहा ठिकाणी विविध कार्यक्रम सादर होणार आहेत.
विद्याधर गोखले यांचा जन्म ४ जानेवारी १९२४ रोजी अमरावती येथे झाला. विद्यार्थीदशेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते कृतिशील स्वयंसेवक होते. १९४२ च्या राष्ट्रीय आंदोलनासाठी, चले जाव चळवळीत कॉलेजला रामराम ठोकून त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्यायला सुरवात केली. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठाची एम. ए. पदवी संपान केली. शायरे आझम गालिब, हिंदुत्वाचा महामेरू, दीपमाळ, सौरभ, मर्दानी झाशीवाली हे चरित्रपर ग्रंथ, जुलेखा (दीर्घकथासंग्रह), रंग इंद्रधनुचे (ललित निबंध), शायरीचा शालीमार (उर्दू शायरीचा परिचय) हे त्यांचे ग्रंथ आहेत. संगीत नाटकांची खंडित झालेली परंपरा त्यांनी लिहिलेल्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाने सुरू झाली. त्यानंतर सुवर्णतुला, मंदारमाला, मदनाची मंजिरी, जय जय गौरीशंकर, मेघमल्हार, स्वरसम्राज्ञी, बावनखणी इ. १४ संगीत नाटके त्यांनी लिहिली. लयदार, खटकेबाज, शाब्दीक कोट्या करीत खेळकर संवादशैली, संस्कृत आणि उर्दू भाषेतील सुभाषिते आणि शेरोशायरीचा मुक्त वापर ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या लेखनात काकासाहेब खाडिलकरांची अर्थमयता आणि देवलांची सुबोधता यांचा मिलाफ झालेला होता.
तुका झाला पांडुरंग, स्वा. सावरकरांचा देव, मिर्झा गालिबचे काव्यदर्शन, उर्दू शायरीतील विनोद, मन करा रे प्रसन्न, योगेश्वर श्रीकृष्ण, हळदीला आलय केशराचे मोल, अमिताभने चमनगोटा केला तर व प्रेयसी ते परमेश्वर इ. विविध विषयांवर त्यांची महाराष्ट्रात सात हजार व्याख्याने झाली. ६६ व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. ते राज्य उर्दू अकादमीचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष होते.
नवव्या लोकसभेवर ते खासदार म्हणून निवडून गेले होते. ते हाडाचे पत्रकार होते. राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव आणि मूल्यधिष्ठित सर्वांगिण राष्ट्र विकास केंद्रस्थानी ठेवून वृत्तपत्रांमध्ये चौफेर, निर्भिड आणि समतोल लेखन त्यांनी केले. त्यांच्या अग्रलेखांचे ५ खंडही प्रकाशित झाले आहेत. संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन हे सांस्कृतिक धर्मकार्य मानून त्यांनी अनेक कार्यक्रमांचे लेखन केले. रंगशारदा प्रतिष्ठान व विद्याधर गोखले नाट्य प्रतिष्ठान या संस्थांची स्थापना त्यांनी केली. अशा या बहुआयामी व्यक्तीमत्वाच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता मुंबईत पुढील वर्षी ४ जानेवारीला संगीत नाट्य महोत्सवाने होणार आहे.