( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील वांद्री गावातील तरुण मकरंद पाल्ये आणि संतोष ठीक या तरुणांनी आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवलं आहे. पैशांची कोणतीही लालसा न ठेवता त्यांनी रस्त्यावर पडलेली बॅग आणि त्यामध्ये पाकिटात असलेले पैसे संबंधित व्यक्तीपर्यंत पोचविण्याचे काम दुसऱ्या व्यक्ती मार्फत केलं आहे. त्याच्या प्रामाणिकपणाच कौतुक होत आहे.
संतोष ठीक आणि मकरंद पाल्ये हे दोघेही वांद्री येथून दुचाकीवरुन रत्नागिरीच्या दिशेने येत होते. निवळी येथे आल्यावर त्यांच्या समोरून जाणाऱ्या दुचाकीवरील बॅग रस्त्यावर पडली. ही बॅग ठीक आणि मकरंद यांनी उचलली आणि त्या गाडीचा पाठलाग करून त्यांना देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्यापर्यंत पोहोचता आलं नाही. ही घटना बुधवारी सकाळ सुमारास घडली. त्यानंतर त्यांनी ही बॅग संध्याकाळी घरी आणली. सबंधित व्यक्ती पर्यंत पोचवण्यासाठी ओळखपत्र मिळते का? हे पाहण्यासाठी त्यांनी घरी सर्वांसमोर बॅग खोलून पाहिली. यावेळी बॅग मध्ये एक पैशाने भरलेले पाकीट दिसले. शिवाय बॅगेत त्यामध्ये महत्वाची कागदपत्र होती. यानंतर त्यांनी ही बॅग गावातील सामाजिक कार्यकर्ते निलेश मेस्त्री यांच्याकडे नेऊन दाखवली. मेस्त्री यांनी कागदपत्रावरील माहिती आणि सबंधित व्यक्तींचा फोन नंबर शोधून काढला. ही बॅग बावनदी येथील ओंकार तोडकरी यांची असल्याचे दिसून आले. त्यांनी तोडकरी यांच्याशी संपर्क साधला. आपली बॅग सुरक्षित असल्याचे ऐकून तोडकरी याना आनंद झाला. त्यानंतर सकाळीच निलेश मेस्त्री ही बॅग घेऊन बावनदी येथे तोडकरी यांचेकडे सुपूर्द केली. त्यांनी मकरंद पाल्ये व संतोष ठीक यांचे आभार मानले आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत काही रक्कम दिली. शिवाय ही बॅग त्यांच्या पर्यंत पोचवल्याबद्दल निलेश मेस्त्री यांचेही तोडकरी यांनी आभार मानले.