(संगमेश्वर/ मकरंद सुर्वे )
रोहा पनवेल दरम्यान मालगाडीचे डबे घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे संगमेश्वर रेल्वे स्थानकातही प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यातच मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानकात गळतीही होत होती. तसेच कचरा पाला-पाचोळा साफसफाई न केल्याने गटाराचे पाणी तुंबल्याने रेल्वे स्थानकात पाणी घुसून काही भागाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी प्रवाश्यांची आपल्या बॅगा-सामान उठवण्यासाठी मोठी गडबड उडाली. यावेळी संगमेश्वरचे स्टेशन मास्तर यांनी स्थानकात पाणी गटाराचे पाणी घुसत असल्याची कल्पना दिली. प्रवाशांनी याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी पावसाचे पाणी आहे, आम्ही काय करणार असे उत्तर दिले. सध्या डेंगू, मलेरिया अशा बऱ्याच आजारांचे थैमान असताना, स्वच्छ भारत अभियान असताना असे अधिकारी कसे उत्तर देऊ शकतात असा प्रश्न यावेळी प्रवाश्यांना पडला होता.