( संगमेश्वर / प्रतिनिधी )
मुंबई – गोवा महामार्गावरील शिंदे आंबेरी येथे आज दुपारी चालत्या टँकरने अचानक पेट घेतल्याने गोंधळ उडाला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत टँकर बाहेर उडी मारल्याने सुदैवाने बचावला.
सविस्तर वृत्त असे की, अशोक चव्हाण (परभणी) हा आपल्या ताब्यातील टँकर मुंबईहून गोव्याच्या दिशेने सिमेंट घेऊन चालला होता. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील शिंदे आंबेरी येथे आल्यानंतर दर्शनी भागातून दुराचे लोट उसळू लागले. वाऱ्याच्या वेगामुळे आगीने आणखी मोठा पेट घेतला. या आगीत पुढचा टायर जळून खाक झाला. आगीने मोठा पेट घेतल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने लगेचच गाडी बाहेर उडी घेतली. महामार्गावरील वाहने ही मदतीसाठी थांबली.
ग्रामस्थांनी घेटनेची माहिती संगमेश्वर पोलिसाना देताच संगमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. भर दुपारची घटना असल्यामुळे ट्रकने मोठा पेट घेतला होता. पोलिसांनी महामार्गावरील म्हात्रे कंपनीच्या पाण्याच्या टँकरला बोलावून घेतले. दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी टँकरच्या सहाय्याने आणि ग्रामस्थांच्या मदतीने जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.