(देवरुख)
महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांपैकी एक असणार्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान इस्लामपूर येथील जाहीर सभेत बोलताना पौरोहित्य करणार्या ब्राह्मण समाजाबद्दल अत्यंत हीन दर्जाचे वक्तव्य केले आहे. तसेच हिंदू धर्मातील कन्यादान विधीची चेष्टा करताना स्वरचित मंत्र म्हणुन समाजाची दिशाभूल केली आहे. असे करण्याचा त्यांचा उद्देश हा पूर्णतः जातीयवादाला पाठींबा देणारा होता. अशा स्थितीत अशी माथेफिरू व्यक्ती महाराष्ट्रातील वरिष्ठ सदन असणार्या विधान परिषदेचा सदस्य असणे समाजासाठी धोकादायक आहे. त्याचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी केली.
यावेळी या सभेस महाराष्ट्र राज्य सरकारमधील दोन मंत्री जयंत पाटील व धनंजय मुंडे उपस्थित होते. अमोल मिटकरी यांनी “मम भार्याम समर्पयामि” असे स्वरचित चुकीचे काहीतरी म्हणुन त्याचा अर्थ सांगितल्यावर दोन्ही मंत्री हसत होते. त्यामुळे या सरकारमधील मंत्री सुसंस्कृत आहेत काय हा प्रश्न उपस्थित रहातो. तर मग हे मंत्री अशा लग्न समारंभात लोकांच्या बायका बघायला जातात का? असा खडा सवाल यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यावेळी विचारला.
लग्नात पिता आपल्या मुलीचे कन्यादान करत असताना धार्मिक मंत्रोच्चार करून विधिपूर्वक उपचार केले जातात. याला एक अधिष्ठान आणि समाजमान्यता प्राप्त आहे. मात्र अमोल मिटकरी यांनी प्राप्त झालेल्या आमदारकीचा आणि भाषण स्वातंत्र्याचा गैरवापर करून नतद्रष्टपणा केला आहे. याचा निषेध म्हणून आज आम्ही अमोल मिटकरीच्या प्रतिमेस जोडे मारून प्रतिमेचे दहन करण्यात येणार आहे, असे माजी उपनगराध्यक्ष व भाजप शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये यांनी सांगितले.
यावेळी देवरुखच्या नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत शेट्ये, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष पंढरीनाथ मोहिरे, युवा नेते भगवंतसिंह चुंडावत, देवरुख नगरपंचायतीचे नगरसेवक, भाजपाचे अनेक समर्थक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी निषेधाच्या घोषणा देत अमोल मिटकरी याच्या प्रतिमेला जोडे मारून नंतर दहन केले.