(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
सलग दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले असून माखजन बाजारपेठ, कसबा बाजरपेठ, रामपेठ आदी बाजरपेठामध्ये बुधवारी संध्याकाळी पाणी घुसण्यास सुरुवात झाली. संध्याकाळी वाढलेला पाऊस यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी रात्र जागूनच काढली. गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने बाजारपेठेतील दुकाने आणि घरे धोका अधिकच वाढला आहे त्यामुळे खबरदारी घेण्यात येत असून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.
मुसळधार पावसामुळे असावी, सोनवी,शास्त्री,बावनदी आदी नद्यांचे पुराचे पाणी जवळच्या गावातून घुसले आहे.सखल भागात असलेल्या रामपेठ, फूणगुस, माखजन आदी बाजारपेठाणामध्ये पुराचे पाणी घुसले आहे. काही दुकानातून पुराचे पाणी घुसल्याने माल सुरक्षित स्थळी हलविण्यात आला आहे.
देवरूख आणि कसबा मार्ग नायरी गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. संगमेश्वर देवरुख मार्गावर हनुमान मंदिराजवळ पाणी येण्याची शक्यता असून हा मार्ग बंद तसेच कसबा बाजारपेठेतील मार्गावर पाणी चढल्यास हे दोन्ही मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. तसेच शेतीत पुराचे पाणी घुसले असून भातशेतीचे नुकसान झाले आहे.