(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर बाजारपेठेतील गटारे कचरा आणि प्लास्टिकमुळे तुंबली असून बाजारपेठेत दुर्गंधी पसरली आहे. गेले अनेक दिवस गटारांमधून दुर्गंधी येत आहे, मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
संगमेश्वर बाजारपेठेत गटारांमध्ये मोठ्या प्लास्टिक कचरा, कागद, केळ्याच्या साली, बॉटल, अन्नपदार्थ, टाकाऊ चिकन भाग आधी मोठ्या प्रमाणात या गटारामध्ये टाकल्याने घाण साचून दुर्गंधी पसरली आहे. बाजारपेठेत येणारे प्रवासी, वाहन चालक आदींना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
संगमेश्वर बाजारपेठेतील बहुतांश भागात गटारे तुंबत आहेत. गटारांमध्ये प्लास्टिक आणि दुकानातील इतर घाण टाकली जात आहे. बाजारपेठेतील गटारांचे काम अर्धवट स्थितीत पडून आहे. संगमेश्वर बाजारपेठ हे मध्यवर्ती बाजारपेठ असून मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग खरेदीसाठी येत असतो. बुधवार हा आठवडा बाजारपेठेचा दिवस असून अनेक ग्राहक खरेदी करीता येत असतात. गटांरामध्ये घाण साचल्याने त्याचा त्रास या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना होत आहे. गटारांच्या या स्थितीमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.