(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे असलेली आदर्श शाळा नं. 1 ही 2020 मध्ये अनधिकृतरीत्या तोडण्यात आली. ही तोडण्यात आलेली इमारत व तिचे सामान रातोरात विकण्यात आले. यामुळे माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन आमची शाळा चोरीला गेल्याचे म्हणत 27 जुन रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना ग्रामस्थ, माजी विद्यार्थ्यांनी सांगितले की, 2020 साली शाळा पाडण्यात आली. याबाबत येथील तुकाराम किर्वे यांनी शाळा का पाडण्यात आली, याचा पत्रव्यवहाराद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. पंचायत समिती प्रशासन आणि ग्रामस्थांची दिशाभूल करून ग्रामपंचायतीच्या जुन्या कमिटीने व ग्रामसेवकाने बेकायदा शाळा पाडण्याचे कारस्थान केले असा आरोप ग्रामस्थांनी केला.
शासकीय नियमांची पायमल्ली करून ही इमारत पाडून नवीन इमारत बांधून देण्यात येणार आहे असा दिखावा जुन्या कमिटीने केला. कोरोना काळात त्यावेळी ग्रामसभा होत नव्हत्या. त्यावेळी शाळा पाडण्याच्या पत्रव्यवहारात महिला बचत गटाच्या सभेसाठी आलेल्या महिलांच्या सह्या घेण्यात आल्या. महिलांना नाहक अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला असेही म्हटले आहे. आता भर पावसात मुलांना प्राथमिक शाळेत कस पाठवणार असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद, पंचायत समिती शिक्षण विभाग आता काय भूमिका घेणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
यात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच येथे असलेल्या शाळेच्या वर्ग खोल्या बांधून देण्यात याव्यात,असे १३ जून रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत मांडण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तसेच याबाबींचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असून त्यांनी २६ जून पर्यत हालचाल न केल्यास थेट जिल्हाधिकारी कार्यलयातच आमरण उपोषणाला बसणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला सरपंच संतोष काणेकर, निवृत्त सहाययक पोलीस निरीक्षक तुकाराम करंडे, उपसरपंच संगम पवार, सामाजिक कार्यकर्ते डॉ अमित ताठरे, निवृत्त अधिकारी गौतम गमरे, सुरेश पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य स्वाती सप्रे, प्राजक्ता लिंगायत, आकांक्षा गौतडे आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.