(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथे खवले मांजर बाळगल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. ललित सतिश सावंत (वय-२५, मुळ रा. मेघी पवारवाडी, ता. संगमेश्वर, सध्या रा. पालघर) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याला न्यायालया समोर आज हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ललित सावंत हा देवळे फाटा ते देवळे मोटारसायकलवरून खवले मांजर घेवून जात असल्याची गोपनीय माहिती देवरूख पोलीसांना मिळाली. त्यानुसार देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी आपले सहकारी हे. काँ. सचिन भुजबळराव, हे. काँ. संतोष सडकर, पो. काँ. ज्ञानेश्वर मांढरे, पो. काँ. रोहित यादव, पो. काँ. रीलेश कांबळे तसेच देवरूख वनविभागाचे वनरक्षक न्हानू गावडे आदिंसह देवळे येथे पोहोचले. त्यांनी ललित याची चौकशी केली असता सिमेंटच्या रिकाम्या पोतळीत जीवंत खवले मांजर आढळून आले. खवले मांजर सह त्याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४४, ४८, ४८ अ, ५१ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तर खवले मांजराला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.