(संगमेश्वर)
मुंबई – गोवा महामार्गवरील संगमेश्वर तालुक्यातील मौजे तुरळ येथे वर्दळीच्या ठिकाणी उड्डाण पूल उभारण्यात यावा अशी मागणी संगमेश्वर (दक्षिण रत्नागिरी) मनसेने कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या चौपदरीकरणाचे काम जोमाने सुरू आहे. परंतु चौपदरीकरणाच्या कामावरून स्पष्ट होत आहे की, महामार्गावरील वहातुक व प्रवाशी सुरक्षेच्यादृष्टीने महामार्गाच्या आराखड्यात कोणत्याही प्रकारचा विचार करण्यात आलेला नाही. लगत असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना देखील विश्वासात घेतलेले नाही. शिवाय महामार्गाच्या कामाच्या कोणत्याही ठीकाणी आराखडा प्रदर्शित केलेला नसल्यामुळे संबंधीत संस्थांसह सर्वसामान्य नागरीक अनभिज्ञ आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील मौजे तुरळ येथे सध्या कडवई , धामापुर व माखजनकडे जाणारे प्रमुख तीन फाटे असुन दुर्गम भागातील सुमारे १५० गावातील प्रवाशांची वर्दळ मोठ्याप्रमाणात असते. शिवाय दुचाकी, तीन चाकी व मालवाहु चारचाकी वाहनांची देखील संख्या जास्त आहे. केवळ महामार्गाचे बजेट कमी करणेसाठी उड्डान पुलाला बगल देत महामार्गाच्या आराखाड्यात याचा विचार न झाल्यामुळेच भविष्यात सदरची बाब स्थानिक सर्वसामान्य नागरीकांच्या जीवावर बेतणार आहे.
चौपदरीकरणाचे काम पुर्ण झाल्यानंतर कडवईकडुन चिपळुणच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांने तसेच वहानचालकांने दोन्ही दिशांकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना हात दाखवुन थांबवायचे का ? आणि ते तसे थांबतील ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपण म्हणाल, सदर ठीकाणी महामार्गावर पांढरे पट्टे मारण्यात येतील, वेग मर्यादा ठेवण्यात येईल. परंतु या सर्व उपाययोजना केल्यानंतर अपघात होऊ नयेत व जीवीतहानी टाळण्याबाबत आपण हमी घेणार का ? याबाबत देखील स्पष्टीकरण होणे गरजेचे आहे.
रायगड जिल्ह्यातील कामोठे येथे शेकडो प्रवाशांची जीवीतहानी झाल्यानंतर शासनाला व संबंधीत खात्याला जाग आली. अशी परिस्थिती आमच्या भागातील सर्वसामान्य नागरीकांच्या वाट्याला येवु नये याकरीता सध्या सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम तात्काळ थांबवुन महामार्गाच्या आराखाड्यात बदल करून संगमेश्वर तालुक्यातील मौजे तुरळ येथे उड्डान पुल उभारण्यात यावा अशी मागणी मनसेने केली आहे.
येत्या महिनाभरात उड्डान पुलाच्या मागणीबाबत आपणाकडुन सकारात्मक कार्यवाही अपेक्षित आहे. अन्यथा सर्वसामान्य नागरीकांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व संबंधीत दुर्गम भागातील नागरीकांच्यावतीने तुरळ येथे महामार्गावर दि. २ मे २०२२ रोजी सकाळी ११.०० वा. ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.