(संगमेश्वर / प्रतिनिधी)
सर्व प्रशासकीय कार्यालयात रिक्त पदांची बोंबाबोंब आहे. या जोडीलाच शिक्षकांचीही पदे मोठ्या संख्येने रिक्त असल्याने या शाळांचा गाडा हाकताना कार्यरत शिक्षकांची दमछाक होतानाचे चित्र संगमेश्वर तालुक्यात दिसत आहे. तालुक्यात सध्या २८ शाळा शून्य शिक्षकी असून, त्या शाळांसाठी ७१ शिक्षक कामगिरीवर काढण्यात आले आहेत.
संगमेश्वर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ३४८ शाळा आहेत. या शाळांकरिता ९९२ शिक्षक मंजूर आहेत. दोन वर्षांपूर्वी या शाळांची संख्या व शिक्षकांची संख्या जास्त होती. मात्र, पटसंख्येअभावी काही शाळा बंद झाल्यानंतर शाळांची व शिक्षकांची संख्या कमी झाली. सद्य:स्थितीत शिक्षकांच्या ९९२ मंजूर पदांपैकी २८५ पदे रिक्त आहेत. कार्यरत ७०७ शिक्षकांपैकी ७१ शिक्षकांवर कामगिरीवर जाण्याची वेळ येत आहे. २८ शाळा शून्य शिक्षकी असून या शाळांची पटसंख्या २५-३५ इतकी आहे.
अनेक वर्षे शिक्षक भरती झालेली नाही. त्यात कोकणात भरती व्हायचे आणि दोन-चार वर्षांनी जिल्हा बदली करून घ्यायची ही बाब नित्याचीच झाली आहे. जिल्हा बदली घेऊन अनेक शिक्षक आपल्या जिल्ह्यात जातात आणि रिक्त पदांची समस्या कायम राहते. त्याचा फटका स्थानिक उमेदवारांसह विद्यार्थ्यांना बसत आहे.
संगमेश्वर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या लांबवर पसरलेला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत मागणीनुसार शिक्षक नसल्याने देवरुखनजीकच्या माळवाशी येथील शाळा विद्यार्थ्यांना न न पाठवता पालकांनी बंद ठेवली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी योग्य ती कार्यवाही झाल्यानंतर शाळा सुरळीत भरली. ग्रामस्थांच्या नाराजीमुळे अशा घटना घडत आहेत.
९३ हंगामी पदे भरणार
तालुक्यात २८५ शिक्षक रिक्त असल्याने सर्व शाळा सुरळीत चालाव्या याकरिता आपण नियोजन केले असून तालुक्यात ९३ पदे तात्पुरती भरण्यास मंजुरी मिळाली असल्याची प्रतिक्रिया देवरुख पंचायत समिती शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांनी दिली. त्यामुळे थोडासा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.