(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यात दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. घरावर, तसेच मार्गावर झाड कोसळणे, घरावर दरड कोसळणे, संरक्षण भिंत कोसळणे अशा घटना घडल्या आहेत. यामुळे लाखो रुपयांची हानी झाली आहे. तालुक्यात तीन दिवसांत २१९ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे.
तालुक्यातील ओझरे बुद्रुक येथील सुगंधा रघुनाथ शेजवल यांच्या घरावर झाड पडून ६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. डावखोल येथील रमाकांत शिंदे यांच्या घरासमोर संरक्षण भिंत कोसळून १ लाख २५ हजार रुपये नुकसान झाले. ही भिंत कोसळल्याने त्यांचा फटका प्रमोद शिंदे यांच्या मालकीच्या सुमो गाडीला बसला आहे. गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. माखजन येथील विजय कातकर यांच्या घराच्या मागील पडवीवर दरडीची माती कोसळून ३ हजारांचे नुकसान झाले आहे.
कोंडिवरे येथील मिलिंद कदम यांच्या घरावर झाड कोसळून ४ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनांमध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. मार्लेश्वर तिठा येथे रस्त्यानजीक असलेले सुके झाड थेट मार्गावर कोसळून, विद्युत वाहिनी तुटण्याचा प्रकार घडला आहे. या सर्व घटनांची नोंद देवरुख तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. संबंधित तलाठ्यांनी त्या त्या ठिकाणी पंचनामा केला आहे.