(देवरुख / प्रतिनिधी)
मराठा सर्वेक्षणाच्या कामासाठी तहसीलदार संगमेश्वर यांनी प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसाचे प्रशिक्षण २१ जानेवारी रोजी देवरुख येथे आयोजित केले होते. या सर्वेक्षणात शिक्षकांना मार्गदर्शन करताना देवरुख तहसीलदार अमृता साबळे यांनी शिक्षक आणि अन्य उपस्थित कर्मचाऱ्यांना थेट मेंढराची उपमा देऊन अपमानित केले. शिक्षक शाळेत काय काम करतात, हे आम्हाला माहित आहे, असे सांगून शिक्षकांच्या शैक्षणिक कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. यामुळे संतप्त झालेल्या शिक्षक संघटनांनी आज अप्पर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांची भेट घेऊन आपले सविस्तर निवेदन सादर केले आहे.
तहसीलदार अमृता साबळे यांनी यापूर्वी बी. एल.ओ. चे काम करणाऱ्या शिक्षकांना देखील अपमानास्पद वागणूक दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जशी सर्व मेंढरं एकापाठोपाठ एक जातात, तसे तुम्ही मेंढरासारखे करू नका. असे उपस्थित शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांना तहसीलदार साबळे यांनी संबोधल्याने उपस्थित सर्व कर्मचारी नाराज झाले. याची दखल संघटनेने घेतली आणि सर्वेक्षणाच्या कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. संगमेश्वर तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांची तातडीची बैठक सोमवारी सायंकाळी देवरुख येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये शिक्षकांना मेंढराची उपमा देत अपमानास्पद वागणूक देणाऱ्या तहसीलदार अमृता साबळे या जोपर्यंत लिखित स्वरूपात दिलगिरी व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत मराठा सर्वेक्षणाच्या कामावर सर्व शिक्षक संघटना बहिष्कार घालणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
संगमेश्वर तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी आज रत्नागिरी येथे जाऊन अप्पर जिल्हाधिकारी यांना आपले निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी शिक्षकांना मेंढराची उपमा देणाऱ्या तहसीलदार अमृता साबळे जोपर्यंत लिखित स्वरूपात दिलगिरी व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत मराठा सर्वेक्षणाच्या कामावर शिक्षक संघटना बहिष्कार घालत असल्याचे नमूद केले आहे . यामुळे सर्वेक्षणाचे काम वेळेत पार न पडल्यास त्याला तहसीलदार स्वतः जबाबदार राहतील असेही नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या नावाने तयार करण्यात आलेले हे निवेदन आज अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. याबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना देखील स्वतंत्रपणे निवेदन देण्यात आले आहे.
अप्पर जिल्हाधिकारी यांच्या भूमिकेचे स्वागत
तहसीलदार देवरुख यांनी शिक्षकांना अपमानास्पद वागणूक दिल्यानंतर सर्व शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. शाळेमध्ये ज्ञानार्जनाचे काम करताना, शासनाकडून देण्यात येणारी विविध कामे देखील शिक्षक करत असतात. यामध्ये खरंतर शिक्षकांची खूप ओढाताण होते. असे असतानाही शिक्षकांना मेंढराची उपमा देणे हे नक्कीच निषेधार्ह आहे. याबाबत आज संघटनांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेतल्यानंतर, त्यांनी या प्रकरणी चौकशी करून आपण तातडीने कार्यवाही करू असे आम्हाला आश्वासित केल्याने, त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत केले आहे .
– दिलीप महाडिक ( प्राथमिक शिक्षक समिती संगमेश्वर तालुका )
फोटो – समितीचे दिलीप महाडिक, शिक्षक बँकेचे संचालक रमेश गोताड आदी निवेदन देताना.