(रत्नागिरी /प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणाऱ्या अदानी ग्रुपविरोधात खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले. या उपोषणाची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कुंडी व निगुडवाडी येथील जमिनीचा घोटाळा सह्याद्री बचाव न्यायहक्क समितीने बाहेर काढला होता. प्रमुख तक्रारदार दिनेश कांबळे यांनी खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन या घोटाळ्याची माहिती दिली होती. त्याआधारे खासदार राऊत यांनी न्याय मिळाला नाही म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले.
अदानी ग्रुप आणि रायपूर राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपन्या व त्यांचे दलाल यांच्या संगनमताने संगमेश्वर तालुक्यात शेकडो हेक्टर शेतजमीन लाटल्याचा प्रकार खासदार राऊत यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडला. समिती गठीत करुन याची चौकशी केली जाईल. मंत्रालयात याविषयी बैठक लावली जाईल या आश्वासनानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते.