(संगमेश्वर / प्रतिनिधी)
चिखली येथील चिखली मोहल्लात एका घराच्या मागच्या बाजूस बिबट्याचे पिल्लू सापडले. याबाबत पोलीस पाटील यांनी वन अधिकाऱ्यांना माहिती दिली. तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील चिखली येथील श्री.समीर हुसैन हुजुरे ( चिखली मोहल्ला ) यांच्या घराच्या मागील बाजूस शनिवारी ( दिनांक ६ मे २०२३) लाकडाच्या खोपी खाली बिबट्याचे पिल्लू सापडले. हा जंगल भाग असल्याने या परिसरात वन्यप्राण्याचा वावर असल्याचे दिसून येते. मात्र बिबट्याचे पिल्लू सापडल्याने बिबट्या देखील याच भागात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घटनेनेबाबत पोलिस पाटील श्री रुपेश विठ्ठल कदम यांनी परिमंडळ वनअधिकारी देवरूख श्री तौफिक मुल्ला यांना माहिती दिली. माहिती मिळताच तत्काळ रत्नागिरीचे परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार यांनी वनकर्मचाऱ्यांच्या समवेत घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. यावेळी बिबट्याचे पिल्लू मोठ्या डालग्या खाली झाकून ठेवल्याचे दिसून आले. सदर पिल्लू हे घाबरलेल्या अवस्थेत असल्याने जंगलात पळून जाऊ नये किंवा नजिक असलेल्या विहिरीत पडू नये यासाठी त्याला सुरक्षित स्थळी झाकून ठेवल्याचे पोलिस पाटील श्री.कदम यांनी सांगितले.
दरम्यान या बिबट्याच्या पिल्ल्याची वन अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यांच्या अंगावर कोणतीही जखम आढळून आलेली नाही. सापडलेले पिल्लू मादी जातीचे असून त्याचे वय अंदाजे 2 ते 3 महिने आहे. या पिल्लास वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन पशुधन विकास अधिकारी देवरूख यांच्या मार्फत तपासणी केल्यावर ते अशक्त असल्याचे पशुसंवर्धन अधिकारी यांनी सांगितले आहे. याबाबत वन्यजीव रक्षक रत्नागिरी श्री.निलेश बापट यांनी खात्री करून या बिबट्याच्या पिल्लास उपचारासाठी तत्काळ वन्यप्राणी प्राथमिक उपचार केंद्र पुणे येथे पाठवण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही मा. विभागीय वनअधिकारी रत्नागिरी चिपळूण श्री दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्री वैभव बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार परिमंडळ वनअधिकारी देवरूख श्री तौफिक मुल्ला करत आहेत.
अशाप्रकारे वन्यजीव अडचणीमध्ये सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क करण्याबाबत आवाहन वनविभागामार्फत करण्यात येत आहे.
-प्रकाश सुतार वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी