( संगमेश्वर/ प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख संगमेश्वर मार्गावर आज बुधवारी दुपारी कोसुंब येथे आयशर टेंम्पोने आणि रिक्षा यांच्या झालेल्या अपघातात 29 वर्षीय महिला ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाफीसा साजीद पठाण (29, कसबा दखणी मोहल्ला, संगमेश्वर) असे ठार झालेल्या विवाहीत महिलेचे नाव आहे. मात्र सुदैवाने या अपघातातून दोन बालके बचावली आहेत.
सविस्तर वृत्त असे की, बुधवार 18 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर ते देवरूखच्या दिशेने रिक्षाने जात होत्या. यावेळी कोसुंब येथे समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने रिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षा रस्त्याच्या बाहेर जाऊन पलटी झाली. ही धडक एवढी मोठी की रिक्षा पलटी होऊन चेंदामेंदा झाला. या अपघात नाफीसा पठाण या रिक्षेमध्येच अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना ग्रामस्थांनी रिक्षातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. सुदैवाने या अपघातात रिक्षातून अरहान शानवाज म्हालदार (2 वर्षे), व हलिमा साजीद पठाण (8 महिने) बाहेर फेकले गेल्याने दोघेही बचावले.
अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलिस घटनास्थळी दाखल झाले. टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.