(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे आर्थिक व्यवहारातून एका तरुणाला दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामध्ये तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महेंद्र रामदास गुरव (30, आरवली, गुरववाडी संगमेश्वर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. महेंद्र यांनी संगमेश्वर पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश सिताराम कदम (40, आरवली बौध्दवाडी, संगमेश्वर), संतोष यशवंत नाचरे (40, आरवली नाचणेवाडी, संगमेश्वर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र गुरव आणि उमेश कदम, संतोष नाचरे यांच्यात पूर्वीच्या कामाच्या आर्थिक व्यवहारावरुन वाद होता. 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वा. महेंद्र गुरव हे माखजन ते आरवली जाणार्या रोडवरुन घरी चालत जात होते. यावेळी रस्त्यावर उमेश आणि संतोष हे दोघे बोलत होते. पूर्वीच्या आर्थिक कामाचा राग धरुन दोघांनी महेंद्र यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावेळी महेंद्र यांनी जाब विचारला असता त्यांच्या डोक्यात संतोष नाचरे याने लाकडी दांडक्याने डोक्यात जोरदार फटका मारला. यामध्ये महेंद्र हे खाली पडले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान महेंद्र गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उमेश कदम, संतोष नाचरे यांच्यावर भादविकलम 324, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.