(संगमेश्वर / प्रतिनिधी)
गावठी हातभट्टी दारूविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत संगमेश्वर तालुक्यात २९ मे रोजी एकाच दिवशी चार ठिकाणी धाड टाकून ८,८६५ रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौजे वांद्री तर नाका येथील एका घराच्या मागील बाजूला जंगलमय भागात पोलिसांनी दुपारी १:३० वाजता कारवाई केली. या कारवाईत विक्रीच्या उद्देशाने ठेवलेल्या दारूसह एकूण १,८४० रुपयांचा माल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंगेश जनार्दन मयेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर सायंकाळी ५:१५ वाजता वाडावेसराड- भंडारवाडी येथे कारवाई करून ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत संदीप बाबू मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तसेच धामापूर तर्फ संगमेश्वर- भुसेवाडी येथे सायंकाळी ५:३० वाजता कारवाई करून ८२५ रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी यशवंत लक्ष्मण भालेकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील तळेकांटे येथील एका धाब्याच्या बाजूला ५,८८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई सायंकाळी ५:४८ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली असून, भास्कर सदाशिव मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.