( देवरूख / प्रतिनिधी )
दोन वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या कालावधीत एसटीची प्रवाशी वाहतूक सेवा बंद असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना थोडेफार काम उपलब्ध होऊन तोट्याचा बोजा कमी व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने माल वाहतुक करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील खासगी व्यवसायिकांना स्वतः च्या व्यवसायासाठी हातभार मिळाला होता. मात्र या वाहतुकीतून लाकडाची वाहतूक करण्याची परवानगी नव्हती. तरीही एस. टी. च्या माध्यमातून लाकडाची वाहतूक होत असताना देवरुख वनविभागाने उघडकीस आणली आहे.
काही दिवसांपूर्वी तुळसणी ते कोल्हापूर या भागातून विनापरवाना लाकडांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती देवरुख वनविभागाला मिळाली होती. दररोजच्या सत्राप्रमाणे साखरपा येथील मुर्शीच्या वन उपजत तपासणी नाक्यावर वनविभागाचे पोलीस गाड्यांची तपासणी करत होते. यावेळी शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तपासणी नाक्यावर आलेली मालवाहतूक एसटी वनरक्षक सुरज तेली यांनी थांबवली. त्यांनी सदर गाडीची तपासणी केली असता जंगली चिरीव लाकूड आढळून आले. याबाबत तेली यांनी चालकाला विचारले असता त्याने ही विनापासिंग लाकडाची वाहतूक करत असल्याचे कबूल केले. त्यानंतर तातडीने देवरूख वनविभागाच्या पोलिसांनी एस टी जप्त करत देवरूखचे वनपाल तौफीक मुल्ला, वनरक्षक सुरज तेली, वनरक्षक संजय रणधीर व वनरक्षक न्हानू गावडे यांनी पुढील कारवाई केली. दरम्यान, या गाडीत एकूण किती लाकूड आहे, हे लाकुड कोणत्या ठिकाणावरून आणले याबाबतचा अधिक तपास देवरुख वनविभागाकडून सुरू आहे.