( मकरंद सुर्वे / संगमेश्वर )
संगमेश्वर तालुक्यातील मांजरे जंगलदेव वाडी येथे विनापरवाना ठासणीची बंदूक, जिवंत काडतुसे तसेच तीन रायफली बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. ओमकार सुरेंद्र देसाई (30, मांजरे ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवार 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरे जंगलदेव वाडी येथे विनापरवाना ठासणीची बंदूक, जिवंत काडतुसे तसेच रायफली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रत्नागिरीतील दहशतवादी पथकाने संगमेश्वर मांजरे येथे धाड टाकून ओमकार देसाई याला ताब्यात घेतले. सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याला ताब्यात घेत विनापरवाना बंदूक व जिवंत काडतुसे, तीन रायफलींची जप्त करून संगमेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी उप निरीक्षक विखे, नरवणे सोबत पोलीस कॉन्स्टेबल विजय तांदळे, भुजबळराव महेश गुरव, पो. चालक कदम यांनी केली.