(देवरुख / सागर मुळ्ये)
भटक्या श्वानांची (कुत्र्यांची) संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या श्वानांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. गतवर्षी संगमेश्वर तालुक्यात ३६९ नागरिकांना श्वानांनी दंश केला होता. सुदैवाने एकाही व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला नाही. श्वान देवरुख परिसरात रस्त्यावरुन जाणारे येणारे यांचा पाठलाग करतात. भटके कुत्रे रात्रीच्या वेळी स्टेट बँक व पोलिस ठाणे परिसर या ठिकाणी दुचाकी वा चारचाकीचाही पाठलाग शंभर ते दिडशे फूट अंतरापर्यंत करतात. यात अनेक दुचाकीस्वार जीव मुठीत घेवून या परिसरातून वावरतात. महिला वर्गदेखील समूहाने जाणे पसंद करतात. यावर नगरपंचायत कोणतीही ठोस भुमिका घेताना दिसून येत नाही. परिणामी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते.
गत वर्षी तालुक्यात या श्वानांनी ३६९ जणांचा चावा घेतला आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे साखरपा परिसरातील मिळून आले. साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात ९५ जणांवर उपचार करण्यात आले. वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २५ रुग्ण, कोंड उमरे येथे ८, फुणगूस ३२, धामापूर २५, बुरंबी २७, सायले १९, देवळे ३०, माखजन ३७, कडवई ४६ व निवे खुर्द २५ असे श्वानदंशाचे रुग्ण मिळून आले. या सर्वांवर प्राथमिक आरोग्य केंद्रामधून उपचार करून बरे करण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी श्वानदंशाची तालुक्यामध्ये ३४३ रुग्णसंख्या होती. तालुक्यामध्ये ३०० च्या वर श्वान दंशाचे रुग्ण वर्षाला मिळून येत असल्याने सरासरी दिवसाला एका व्यक्तीला श्वान दंश होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. यासाठी ग्रामपंचायत व नगरपंचायतीने आपापल्या परिसरामध्ये उनाड व भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची तयारी दाखवणे गरजेचे आहे. अन्यथा श्वानांची संख्या वाढून तितकीच संख्या श्वानदंशाचीही वाढू शकते. यासाठीच नगरपंचायत व ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन उपाय योजना देखील आखणे गरजेचे आहे.
नगरपंचायतीने दोन वर्षांपूर्वी नर श्वानांची पकड करून नसबंदी केली होती. अशाच प्रकारचा कार्यक्रम वर्षातून एकदा आखण्याची आवश्यकता आहे. सुदैवाने शासनाकडून प्रत्येक ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये श्वान दंशाची लस उपलब्ध केल्यामुळे व तात्काळ रुग्णाला लस दिल्यामुळे मृत्यूचे प्रमाण नसल्याचे स्पष्ट होत आहे.