( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील गोळवली यादववाडी स्टॉप येथे काल गुरुवारी 9 जुलै रोजी सायंकाळी खवले मांजराची तस्करी होणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला लागली होती. त्यानुसार संगमेश्वर पोलिसांच्या मदतीने एलसीबीच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला.
दरम्यान संशयित खवले मांजर घेऊन स्टॉप जवळ येताच त्याची चौकशी करण्यात आली. त्याच्याकडे लाल – हिरव्या रंगाच्या पिशवी मध्ये 1 किलो 710 ग्रॅम वजनाचे खवले मांजर आढळून आले. एकनाथ महादेव पंडव (49, चिखली पंडववाडी, संगमेश्वर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित प्रौढाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार प्रशांत बोरकर यांनी फिर्याद दाखल केली.
त्यानुसार पंडव याला एलसीबीच्या पथकाने पुढील कारवाईसाठी संगमेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.