संगमेश्वर तालुक्यातील आरवली राजीवली मार्गावर मुरडव बौद्धवाडी वळणावर डंपर आणि दुुुुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात योगेश तुकाराम बाटे (26) जागीच ठार झाला आहे. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला.
संगमेश्वर पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहिती नुसार, सकाळी मुरडव बाटेवाडीत राहणारा योगेश तुकाराम बाटे हा तरुण आरवलीहून मुरडवकडे दुचाकी (एमएच 04 डीएच 1983) ने चालला होता. मुरडव येथील वळणावर येताच समोरून येणाऱ्या डंपर (एमएच 04 सीयू 9663) यांच्यात धडक झाली. दुचाकी डंपरच्या उजव्या बाजूला धडकली. याच वेळी योगेश डंपरच्या मागील चाकाखाली आला आणि डंपरचे चाक योगेश बाटेच्या डोक्यावरून गेले. ही धडक एवढी मोठी होती की, दुुुचाकीस्वार योगेश बाटे जागीच ठार झाला.
याबाबतची फिर्याद मुरडव गावचे पोलीस पाटील राजेंद्र मेणे यांनी दिली आहे. पोलिसांनी डंपरचालक राकेश लक्ष्मण कांबळे याच्यावर 304(अ)337, 338, 279 आणि मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघाताचा तपास माखजनचे हेडकॉन्स्टेबल प्रशांत शिंदे, तेजस्विनी गायकवाड करीत आहेत.