( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर जवळच्या एका चिरेखाण व्यावसायिकाचा रात्रीस खेळ चालू आहे. एका गावामध्ये या व्यवसायिकाने चिरेखाणीचा परवाना मिळवला आहे मात्र उत्खनन बॉक्साइडचे करत आहे. एवढेच नव्हे तर हे बॉक्साईडचे उत्खनन करून परजिल्ह्यात विक्रीला जात असल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी डंपर, ट्रक मधून त्याची विक्री होते मात्र कोणालाही दिसू नये यासाठी त्यावर ताडपत्री बांधून वाहतूक करत आहे. त्याच्या या रात्रीस खेळ चाले प्रकाराला कोणाचा आशिर्वाद आहे का? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे. या बॉक्साईडचा वापर अल्युमिनियम बनवण्यासाठी केला जातो. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र शासनाचा कर चुकवून हे उत्खनन केले जात असल्याचे बोलले जात आहे.
चिरेखाणीच्या नावावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बॉक्साईडच्या वाहतुकीला संगमेश्वर तहसीलदार आळा घालणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. आता तहसीलदार कोणती कारवाई करतात हे पहावं लागणार आहे.