( संगमेश्वर / प्रतिनिधी )
नायरी- निवळी हा मुख्य रहदारीचा-रस्ता असून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. निवळी या दुर्गम भागात जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. निवळी गावातील नागरिकांना दैनंदिन दळणवळण साठी हा रस्ता महत्त्वाचा असल्याने सदर रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी निवळी गावचे ग्रामस्थ व गाव विकास समितीचे संगमेश्वर सरचिटणीस दैवत पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दैवत पवार यांनी म्हटले आहे की,गावाच्या अलीकडे तीव्र चढ व उतार असणाऱ्या निवळी घाटात हा रस्ता अतिशय खराब झाला असून वाहनचालक जीव मुठीत घेऊन गाड्या चालवत असतात.खराब रस्त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.या रस्त्याची तातडीने डांबरीकरण व्हावी अशी निवळी गावातील ग्रामस्थांची मागणी आहे असे दैवत पवार यांनी म्हटले आहे.
संबंधित अधिकारी व विभागांना याबाबत योग्य त्या सूचना देऊन या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात यावे अशी आमची येथील ग्रामस्थांच्या वतीने मागणी असल्याचे दैवत पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.