( संगमेश्वर / प्रतिनिधी )
खाद्य संस्कृतीत आधुनिक जंक फूडचे होणारे आक्रमण लक्षात घेता स्थानिक उपलब्ध साहित्य नजरेसमोर ठेऊन काही पदार्थात भर पडू शकते किंवा एखादी पाकक्रिया किंवा पदार्थ पुनरुज्जीवित होऊ शकतो, या उद्देशाने दि ड्राइव्ह इनच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वेळेचा पाक कलेचा विषय होता कुळीथा पासून तयार केलेले पदार्थ. स्पर्धेस दरवर्षी प्रमाणे चांगला प्रतिसाद लाभला.
स्पर्धेत एकूण २२ स्पर्धकांनी भाग घेतला. विविध महाविद्यालयातून १३ विद्यार्थी तसेच ९ गृहिणींनी भाग घेतला. स्पर्धकांनी त्यांच्या पदार्थांची मांडणी संध्याकाळी ३.३० ते ४.३० या वेळात केली. कुळीथा पासून तयार केलेल्या पदार्थामध्ये मखनी, पराठा, सलाड, खिचडी, लाडू, कटलेट, स्टीक्स, अप्पे, केक, सूप, इडली, टिक्की, उत्तप्पा, भजी, पुरणपोळी, सँडविच ढोकळा, शेंगोळ्या, थालीपीठ, उपमा अशा पदार्थांची रेलचेल होती. नवनिर्माण कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे ताराचंद ढोबळे व सौ. मेघना शेलार यांनी पदार्थांचे परीक्षण केले.
प्रथम क्रमांक सौ. वैशाली पटेल यांना त्यांनी केलेल्या सँडविच ढोकळ्यास मिळाला, द्वितीय क्रमांक सौ. राजश्री भांगे यांनी केलेल्या लाडुला मिळाला, तृतीय क्रमांक कुमारी ऋतुजा पांचाळ या उत्कर्ष अकादमीच्या विद्यार्थिनीने केलेल्या बूस्टर सूपला मिळाला. परीक्षकांनी पदार्थांचे अवलोकन करून स्पर्धकांना मार्गदर्शन केले. रस्टिक हॉलिडेजच्या सौ. शिल्पाताई करकरे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. लायन्स क्लबचे प्रेसिडेंट सतीश पटेल यांनी सर्वांचे आभार मानले. स्पर्धकांचे कौतुक करण्यास आणि विविध पदार्थ उत्सुकतेने पहाण्यास नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस संसारे यांनी केले.