(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्गावरील महत्वपूर्ण अशा संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात विविध सुविधांचा अभाव आहे. या रुग्णालयातील अनेक वर्षे रिक्त पदे असल्याने आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम झाला आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अतिरिक्त भार सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत असल्याने ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी आता नागरीकांमधून होत आहे.
रुग्णालयात ड्रामा केअर सेंटर असल्यामुळे एकही भुलतज्ञ डॉक्टर तसेच रुग्णालयातील इतर पदेही रिक्त असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. एखादा सिरियस पेशंट रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात हलविण्याचे प्रकार येथे होतात. गेले कित्येक दिवस रुग्णालयातील महत्वाचीच पदे रिक्त असल्याने त्या कामाचा ताण रात्रंदिवस सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर पडत आहे.
रिक्त पदामध्ये ५ डॉक्टर त्यामध्ये १ भूलतज्ञ, ४ परिचारिका, १ शिपाई, १ सपाई कामगार, मंजूर पद १ अशी महत्वाची १२ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरली जात नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असते. संगमेश्वर ग्रामीण रूग्णालय फक्त शोसाठी उभारलेय का ? असा संतप्त सवाल नागरीकांकडून वेळोवेळी उपस्थित केला जातो. तसेच या रिक्त पदाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.
रुग्णालयातील १२ पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने रुग्णांनी या रुग्णालयाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. ही रिक्त पदे भरल्यास छोटी – मोठी ऑपरेशन याच ठिकाणी होऊन रुग्णांना जिल्हा रूग्णालयात जावे लागणार नाही. याच ग्रामीण रुग्णालयात योग्य उपचार होतील. तसेच अतिमहत्वच्या ठिकाणी असलेल्या संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदे भरून नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.
अपघातातील जखमींवर उपचारासाठी होतो उशीर
मुंबई-गोवा महामार्गावर चोवीस तास रहदारी असते. परिसरात अपघात झाल्यास त्यास रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात न्यावे लागते. रूग्णालयात दोन रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. मात्र या दोन्ही रुग्णवाहिकांसाठी एकच ड्राइव्हर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांकडून वेळोवेळी संतप्त प्रतिक्रिया उमटत असतात व यावरून वादही होतात. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज असते. मृतदेह अंत्यसंस्करासाठी नेण्यासाठीही रुग्णवाहिकेची मागणी असते. अपघात, डिलिव्हरी, सर्पदंश अशा अतिगंभीर रुग्णांना केवळ एकाच रुग्णवाहीकेतून जिल्हा रूग्णालयात दाखल कसे करणार? असा सवाल उपस्थित होत आहे. संगमेश्वर ते रत्नागिरी यामधील अंतर ४० किलोमीटर आहे. रत्नागिरीतील रुग्णालयात जाण्यास कमीत कमी एक तास लागतो. यामुळे एखाद्या अपघातात गंभीर जखमी रुग्णांना जिल्हा रूग्णालयात घेऊन जाणे कठीण होते, यात रुग्ण दगावण्याचीही मोठी भीती असते.