(संगमेश्वर /प्रतिनिधी)
निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या वतीने संगमेश्वर तालुक्यातील नेत्रावती व मत्स्यगंधा एक्स्प्रेस गाड्या संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा, तसेच स्थानकातील गैरसोयीसंदर्भात ग्रुपच्यावतीने नुकतीच ग्रुप चे प्रमुख संदेश जिमन (पत्रकार) यांनी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाची पाहणी केली. सोबत कोकण रेल्वेचे अभियंते हे उपस्थित होते.
यावेळी स्थानकातील गैरसोयींबद्दल चर्चा करण्यात आली.
यावेळी फलाट नं. 1 वरील वर-खाली झालेले पेवर ब्लॉक व फलाट क्रमांक 2 वर पेवर ब्लॉक नसून त्यावर पावसाने जमा झालेल्या मातीमुळे पाय घसरण्याची भीती आहे. हे अधिकार्यांच्या लक्षात आणून दिले. फलट क्र. 1 वर अजून निवारा शेडची गरज आहे. तसेच फलाट क्रमांक 1 आणि 2 ला जोडणारा रत्नागिरी दिशेकडे पुलाची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले. मुंबई दिशेला दोन फलाटांना जोडणारा एकच पुल असल्याने गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या होणार्या अडचणींकडे लक्ष वेधण्यात आले. फलाट क्रमांक 1 व 2 वर मोठ्या प्रमाणावर वाढलेली झाडी कापण्यात यावी हेही लक्षात आणून दिले.
कोकण रेल्वेच्या अधिकार्यांनी या सर्व गोष्टीचे निरीक्षण आणि नोंदी करून घेतल्या व गणपती सणाच्या आधी यातील जास्तीत जास्त अडचणी सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले.