(मुंबई)
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांनी प्रयत्न सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे १९ कोटींची जीएसटी रक्कम थकल्याने वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी आयुक्तालयाकडून कारवाई करण्यात आली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारवर नाराजीही व्यक्त केली. आता अडचणीत सापडलेल्या पंकजा मुंडेंना मंत्री धनंजय मुंडे मदतीचा हात देणार असल्याची समोर येत आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढल्या असून, कारखानाही संकटाच्या गर्तेत रुतत चालला आहे. अशा स्थितीत या कारखान्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी बंधू तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे मदतीचा हात देण्यासाठी सरसावले आहेत. या कारखान्याला मदत करण्याकरिता खुद्द धनंजय मुंडे हेच राज्य सरकारकडे मदतीचा प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा कारभार खुद्द पंकजा मुंडे पाहतात. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात समेट घडवली गेली आणि पुन्हा हा कारखाना पंकजा मुंडे यांच्या ताब्यात दिला गेला. परंतु हा कारखाना बंद असल्याने आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात साखरेवरील जीएसटी थकविल्याच्या कारणावरून जीएसटी आयुक्तालयाने धडक कारवाई केली. त्यावरून पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आले. कारण पंकजा मुंडे या राज्यातील राजकीय उलथापालथ, त्यात भाजपला मिळालेले नवे मित्र आणि त्यातून बदललेली राजकीय समीकरणे यावरून नाराज आहेत. त्यामुळे त्या वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर कारवाई केली गेली असल्याचा आरोप पंकजा मुंडे समर्थक करीत आहेत. तसेच विरोधकांनीही याच मुद्यावरून भाजपला लक्ष्य केले आहे. दरम्यान, एकीकडे माजी मंत्री पंकजा मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न होत असतानाच त्यांचेच एकेकाळचे कट्टर विरोधक राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे बहिणीच्या मदतीला धावून जाणार असल्याचे समजते. त्यांच्यासह कारखान्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी धनंजय मुंडे यांनी हालचालीही सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी ते स्वत: आपल्या भगिनीशी चर्चा करणार असल्याचे समजते.
“आर्थिक अडचणीत असलेल्या इतर कारखान्यांना सरकारने मदत केली. पण मी सोडून बाकी सर्वांना आर्थिक मदत मिळाली. जर मदत मिळाली असती तर असे प्रकार घडले नसते”, अशी खंत पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, आता पंकजा मुंडे यांचे भाऊ कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राजकीय वैर विसरत बहीण पंकजा मुंडे यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी परळीतून पंकजा मुंडे यांना पराभूत करून पराभवाचा वचपा काढला होता. मात्र, अलिकडे परळीतील राजकीय समिकरणे बदलल्याचे चित्र आहे. पण हे दोन कट्टर विरोधक भविष्यात एकत्रित येणार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.