(चिपळूण /ओंकार रेळेकर)
शिवसेना नेते आमदार श्री भास्करराव जाधव यांनी आज त्यांच्या मतदारसंघातील खेड तालुक्यातील वावे, चिपळूण तालुक्यातील रामपूर आणि गुहागर तालुक्यातील आबलोली येथील आरोग्य केंद्रांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत राज्याच्या आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासोबत बैठक घेऊन ठोस निर्णय करून घेतले. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनातील त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीला आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आमदार श्री भास्करराव जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा करून मतदार संघातील रामपूर आणि वावे या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ग्रामीण रुग्णालयांमध्ये श्रेणीवर्धन करून घेतले. श्रेणीवर्धित झालेल्या 30 खाटांच्या या रुग्णालयांसाठी नव्याने पदनिर्मिती होऊन विविध प्रकारची अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपकरणे उपलब्ध व्हावेत, त्याचबरोबर आबबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन व्हावे यासाठी गेले वर्ष-दीड वर्ष ते सतत पाठपुरावा करत होते. हे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी त्यांनी मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने आज ही बैठक झाली.
बैठकीच्या सुरुवातीलाच रामपूर आणि वावे येथे नवीन पदनिर्मितीनुसार कर्मचारी नियुक्त करण्याचा विषय समोर आला. त्यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सध्या जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी मेडिकल कॉलेजच्या अखत्यारीत काम करत आहेत. मेडिकल कॉलेजमध्ये कर्मचारी नियुक्त झाले की मोकळे झालेले सिव्हिल कर्मचारी या रुग्णालयांमध्ये पाठवू, असे सांगितले. पण त्यावर आमदार श्री जाधव यांनी आक्षेप घेतला. मेडिकल कॉलेजचे कर्मचारी नियुक्त व्हायला अजून 6 महिने, वर्षपण लागेल. इतका वेळ वाट पाहायची का? असा सवाल त्यांनी करताच डॉक्टर सावंत यांनी त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
भास्करराव जाधव म्हणतात हे बरोबर आहे असे सांगत 15 दिवसात या दोन्ही रुग्णालयातील रिक्त जागा भरा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले वावे आरोग्य केंद्राची जागा अजून शासनाच्या मालकीची नाही, हा मुद्दा पुढे येताच आमदार श्री जाधव यांनी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जागा ताब्यात घेण्यासंदर्भात केव्हाच पत्र दिले आहे, ही बाब लक्षात आणून दिली. याबाबत झालेल्या चर्चेत जागेचा सातबारा अजून शासनाच्या मालकीचा झालेला नाही ही बाब समोर येतात आमदार श्री जाधव यांनी तिथूनच तात्काळ जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांना फोन केला आणि हे काम का प्रलंबित राहिले? अशी विचारणा केली. त्याचवेळी आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री मिलिंद म्हैसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ सातबारा करून घ्या, अशी सूचना केली.
आबलोली आरोग्य केंद्राच्या रखडलेल्या श्रेणीवर्धनाबाबतचा मुद्दा आमदार श्री जाधव यांनी उपस्थित केला, तेव्हा हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता परंतु त्यात काही त्रुटी असल्याने त्या दुरुस्ती करून पुन्हा प्रस्ताव शासनाला पाठवायचा आहे, अशी माहिती डॉ. फुले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली. त्यावर आमदार श्री. जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्रुटी दूर करून प्रस्ताव पाठवण्यास इतके दिवस लागतात का, अशी विचारणा त्यांनी अधिकाऱ्यांना केली. त्यावर मंत्री डॉ. सावंत यांनीही ही बाब योग्य नसून तात्काळ प्रस्ताव पाठवण्याच्या आदेश दिले.