(रत्नागिरी /प्रतिनिधी)
आजकाल धावपळीच्या व स्पर्धात्मक 21 व्या शतकाच्या विज्ञानाच्या युगात विविध स्तरातून प्रगती होत आहे. आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी तर आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे परंपरागत चालत येणाऱ्या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागामार्फत श्री छत्रपति शिवाजी हायस्कूल झाडगाव येथे पावसाळी रानभाज्यांचे प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला संस्थेचे आजीवसेवक विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत काटे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सोनाली कदम, प्राध्यापिका प्रियांका शिंदे, शिक्षक तानाजी गायकवाड, दिपक पाटील, अशोक सुतार यांच्याबरोबरिने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे वनस्पीशास्त्राचे विद्यार्थी स्मिती कांबळे, अनुष्का शर्मा, आफा काझी, तन्वी भाटकर, ममता नानरकर, मरयम गोवळकर, यश मयेकर, सिध्दार्थ मराठे आदी उपस्थित होते.
या रानभाज्या महोत्सवाबाबत माहिती देताना वनस्पति शास्त्राच्या प्राध्यापिका सोनाली कदम यांनी सांगितले की, शेती किंवा निशा न करता निसर्गतःच उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. निसर्गात लागवड न करता या वनस्पती येतात. त्यामुळे या वनस्पतीमध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य व अत्यंत उपयोगी रसायने असे घटक आढळतात. या भाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्मही असतात. त्या आवर्जून खाल्या पाहिजे. जंगलालगतचे आदिवासी आजही त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून जंगलातील वनस्पतीचाच वापर करतात. ऋतूनुसार त्यांना या भाज्या सहज उपलब्ध होतात. त्यांच्या जुन्या पिढीतील भाज्यांचे हे ज्ञान नव्या पिढीतही कायम असते. या वनस्पती त्यांच्या दैनंदिन खाद्यन्नातील अविभाज्य घटक आहेत. तसेच संस्थेचे आजीवसेवक शशिकांत काटे यांनी देखील विद्यार्थ्यांना रानभाज्या संदर्भात माहिती दिली. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव, रत्नागिरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.