श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी रानिल विक्रमसिंघे यांची निवड झाली आहे. विक्रमसिंघे १३४ मतांनी विजयी झाले. राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानले जाणारे साजिथ प्रेमदासा बाहेर पडल्यानंतर रानिल विक्रमसिंघे विरुद्ध डलास अलाहाप्पेरुमा यांच्यात संघर्ष होता. रानिल विक्रमसिंघे यांच्या विरुद्ध एसएलपीपी खासदार डलास अलाहाप्पेरुमा हे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार होते. विक्रमसिंघे यांनी डलास अलाहाप्पेरुमा यांचा पराभव केला आहे.
श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पलायन करून राजीनामा दिल्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे कार्यवाहक राष्ट्रपतीपदाची जबाबदारी होती. पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यवाहक राष्ट्रपतीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर आज राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली.
रानिल विक्रमसिंघे यांनी १३४ मतांनी विजय मिळवला आहे. २२५ खासदारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत मतदान केले. विजयासाठी उमेदवाराला ११३ हून अधिक मते मिळवणं आवश्यक होते. या निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे १३४ मते मिळवत राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत.आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण झाल्यापासून भारत हा एकमेव देश श्रीलंकेला सातत्याने मदत करत आहे. यामुळे श्रीलंकेतील जनतेसह सरकार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारला सातत्याने आवाहन करत आहे. बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली भूमिका बदलू नये, असे आवाहन श्रीलंकेने केले आहे. कारण भारताच्या मदतीने श्रीलंका या संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.