(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते पंचक्रोशीतील मळदेवाडी येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रामनवमी उत्सव गुरुवार दिनांक ३० मार्च रोजी मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.
गेली ३९ वर्षे हा सोहळा श्रीराम सेवा मंडळ मळदेवाडीतर्फे अविरतपणे चालू आहे आणि आता त्याचे नामांतर श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट मळदेवाडी या नावाने झाले आहे. या सोहळ्यास पंचक्रोशीतील तसेच आजूबाजूच्या गावातील भाविक, भक्तगण मोठया संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटतात.
सकाळी काकड आरतीने कार्यक्रमास प्रारंभ होऊन, प्रवचन, दुपारी श्रीराम जन्मोत्सव, दिंडी, महाप्रसाद, सायंकाळी सुस्वर भजन, हरिपाठ, कीर्तन आणि रात्री नमन अशी कार्यक्रमाची रूपरेषा याचा सर्वच भाविक आस्वाद लुटतात.या कार्यक्रमाचा आनंद आपणांस “याची देही याची डोळा” पाहण्याची अनुभूती मिळते. कार्यक्रमासाठी गावचे तसेच मुंबईस्थित मंडळाचे, महिलामंडळ तसेच तरुणवर्गाचे मोलाचे सहकार्य लाभते.