(जीवन साधना)
सर्व देवतांच्या आधी श्री गणेशाची पूजा केली जाते. गणेशाला बुद्धीदाता म्हटलं जातं. विघ्न दूर करणारा म्हणून विघ्नदाता असेही गणेशाला म्हटलं जातं. गणरायाच्या अनेक कथा सांगितल्या जातात. तर गणेश पुजेशी संबंधित काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात.
शास्त्रानुसार श्रीगणेशाच्या सर्व शरीरावर आयुष्य आणि ब्रह्मांडाशी संबंधित खास अंग विराजमान आहेत. गणेशाच्या पाठीवर दरिद्रता म्हणजे गरिबी निवास करते. यामुळे श्रीगणेशाच्या पाठीचे दर्शन घेतले जात नाही. जे लोक पाठीचे दर्शन घेतात त्यांना धनाच्या कमतरतेला, अडचणीला सामोरे जावे लागू शकते असे मानले जाते.
गणेशाच्या कोणत्या अंगावर आयुष्य आणि ब्रह्मांडाचे कोणते अंग विराजमान आहे –
श्रीगणेशाच्या सोंडेवर धर्म विद्यमान असून कानांवर ऋचा, उजव्या हातावर वर, डाव्या हातावर अन्न, पोटामध्ये समृद्धी, नाभीमध्ये ब्रह्माण्ड, डोळ्यामध्ये लक्ष्य, पायांमध्ये सातही लोक आणि मस्तकावर ब्रह्मलोक विद्यमान आहे. त्यामुळे श्रीगणेशाचे समोरून दर्शन घेतल्यानंतर सर्व सुख प्राप्त होतात.
गणेशाच्या पाठीवर दारिद्रतेचा निवास असतो. गणेशाच्या पाठीचे दर्शन घेणारा व्यक्ती खूप धनवान असला तरी त्याच्या घरावर दारिद्र्याचा प्रभाव कालांतराने वाढत जातो. यामुळे गणेशाच्या पाठीचे दर्शन घेऊ नये. नकळतपणे पाठीचे दर्शन घेतल्यास गणेशाची क्षमा मागून त्यांची पूजा करावी.
श्रीगणेशाला तुळस अर्पण करू नये. प्राचीन कथेनुसार देवी तुळशीने श्रीगणेशाला आणि श्रीगणेशाने तुळशीला शाप दिला होता. याच शापामुळे श्रीगणेशाला तुळस अर्पण केली जात नाही. तसेच घरामध्ये श्रीगणेशाच्या मूर्ती, फोटो ठेवायचे असल्यास त्यांची संख्या सम म्हणजे 2,4,6 असावी. शास्त्रानुसार मूर्तींची संख्या विषम म्हणजे 1,3,5 नसावी.
महादेवाप्रमाणेच त्यांचे पुत्र श्रीगणेशाला केतकीचे फुल अर्पण करू नये. मान्यतेनुसार, ब्रह्मदेवाने एक असत्य गोष्ट बोलली होती, ज्यामध्ये केतकीचासुद्धा सहभाग होता. तेव्हापासून शिव कुटुंबाच्या पूजेमध्ये केतकीचे फुल अर्पण केले जात नाही.
(टीप: वरील माहिती सर्वसामान्य मान्यता व प्रचलित ज्ञानानुसार देण्यात आली आहे)