(गुहागर/उदय दणदणे)
गुहागर तालुक्यातील वरवेली-तेलीवाडी येथील ग्रामस्थांची मोठी शोकांतिका आहे. स्मशानभूमी आहे परंतु ती नदीच्या पलीकडे आहे. गावातील व्यक्ती मृत झाल्यावर कंबरेभर पाण्यातून अंत्ययात्रा नेण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. उन्हाळ्यात एखादी व्यक्ती मरण पावल्यास स्मशानभुमीपर्यंत जाण्यास काही अडचणी नाहीत, परंतु पावसाळ्यात मात्र एखादी व्यक्ती मृत झाल्यास नदीतून प्रेत घेऊन जाणार कसे असा प्रश्न येथील ग्रामस्थांना वारंवार पडत आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
वरवेली-तेलीवाडीची स्मशानभूमी ही नदीच्या पलीकडे आहे. ही स्मशानभूमी जिल्हा परिषदेच्या निधीतून शासकीय जागेवर बांधण्यात आली आहे. नदीच्या पलीकडे स्मशानभूमी असल्यामुळे वास्तविक या ठिकाणी जाण्यासाठी पुल बांधणे गरजेचे होते. येथील नागरिकांनी वारंवार ही गोष्ट प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र नागरिकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. अडचणीच्या पायवाटा, दगडगोटे, काटे – कुटे तुडवत भरपावसात कंबरभर पाण्यातून मार्ग काढत प्रेतयात्रा न्यावी लागते. ही तारेवरची कसरतच आहे. लाकडे नेणे, इतर सामना नेण्यासाठी वारंवार याच नदीतून जावे लागते. त्यामुळे पावसाळ्यात प्रेत झाल्यास येथील ग्रामस्थांना मनस्ताप होतो. इथे एखाद्याच्या मृत्यूनंतर मरणप्राय यातना भोगाव्या लागत आहेत त्या जिवंत माणसांना !
एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जातोय आणि दुसरीकडे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे नमुने ग्रामीण भागातील जनतेला पाहायला मिळत आहेत. ग्रामीण भागातली जनता आजही अनेक मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे आणि प्रशासकीय, शासकीय पातळीवर वृत्तपत्र, सोशल मीडियातून आम्ही स्वातंत्र्याचा महोत्सव कशाप्रकारे साजरा करतो याचे कागदी घोडे रंगवले जात आहेत. प्रसिध्दी मिळवली जात आहे. प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागातील प्रश्न जैसे थे च आहेत.