(हैदराबाद)
येथील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सची लढत रंगली. या सामन्यात हैदराबादचा विजय निश्चित मानला जात असताना कोलकात्याच्या वरुण चक्रवर्तीने शेवटचे जादुई षटक टाकत नाईट रायडर्सला पाच धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूवर सामन्याचा निकाल लागला. वरुण चक्रवर्तीने शेवटच्या षटकात ९ धावांचा बचाव केला. या पराभवामुळे हैदराबादची प्ले ऑफमध्ये जाण्याची वाट बिकट झाली आहे.
तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत नऊ गडी गमावून 171 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून रिंकू सिंगने सर्वाधिक ४६ धावा केल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादकडून मार्को जॉन्सन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 166 धावा करता आल्या. सनरायझर्स हैदराबादकडून एडन मार्करामने सर्वाधिक 41 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून शार्दुल ठाकूर आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
Match 47. Kolkata Knight Riders Won by 5 Run(s) https://t.co/xYKXAE6NDg #TATAIPL #SRHvKKR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2023
सनरायझर्स हैदराबादने १६ ते २० षटकांमध्ये तीन विकेट गमावल्या. या कालावधीत त्यांनी केवळ ३२ धावा केल्या. एकावेळी त्यांना विजयासाठी ३० चेंडूत ३८ धावा करायच्या होत्या, संघ सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण हैदराबादने हातातला सामना गमावला.
सनरायझर्स हैदराबादकडून कर्णधार एडन मार्करामने ४१ आणि हेनरिक क्लासेनने ३६ धावा केल्या. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ४७ चेंडूत ७० धावांची भागीदारी केली. एकवेळ सनरायझर्सची धावसंख्या ६.२ षटकांत ४ बाद ५४ अशी होती. राहुल त्रिपाठी २०, मयंक अग्रवाल १८, अभिषेक शर्मा ९ धावा करून बाद झाले. हॅरी ब्रूकला खातेही उघडता आले नाही. ४ विकेट पडल्यानंतर मार्कराम आणि क्लासेनने संघाला सामन्यात परत आणले. अखेरीस, अब्दुल समदने १८ चेंडूत २१ धावा केल्या, पण तो सामना जिंकून देऊ शकला नाही.