( नवी दिल्ली )
आयपीएलच्या चालू हंगामात दिल्ली कॅपिटल्सला अखेर पहिला विजय मिळाला आहे. गुरुवारी रोजी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात दिल्लीने (DC) कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) ४ गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने शानदार अर्धशतक झळकावले. १२७ धावांचा पाठलाग करताना दिल्लीची तारांबळ उडाली होती. डेविड वॉर्नरचे अर्धशतक वगळता दिल्लीच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अक्षर पटेल याने अखेरच्या षटकात निर्णायक फलंदाजी केल्यामुळे दिल्लीचा विजय झाला. दिल्लीने चार विकेट आणि चार चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील दिल्लीचा हा पहिला विजय होय. लागोपाठ पाच पराभवानंतर दिल्लीने पहिला विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे.
कोलकात्याने दिलेले १२८ धावांचे आव्हान पार करताना दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फलंदाज पृथ्वी शॉ पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतला. पृथ्वी शॉ याला १३ धावांवर वरुण चक्रवर्तीने तंबूत धाडले. त्यानंतर मिचेल मार्श आणि सॉल्टही एकापाठोपाठ एक तंबूत परतले. मिचेल मार्श दोन तर सॉल्ट पाच धावा काढून बाद झाले.
एका बाजूला विकेट पडत असताना दुस-या बाजूला डेविड वॉर्नर संयमी फलंदाजी करत होता. पण वरुण चक्रवर्ती याने डेविड वॉर्नर याला तंबूत पाठवले. वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली. वॉर्नरने ४१ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ११ चौकार लगावले. वॉर्नर बाद झाल्यानंतर मनिष पांडे आणि अक्षर पटेल यांनी डाव सांभाळला. मनिष पांडे २१ धावांवर बाद झाला. त्यानंतर अमन खान गोल्डन डकचा शिकार झाला. त्यानंतर अक्षर पटेल याने ललीत यादव याला जोडीला घेत दिल्लीला विजय मिळवून दिला. धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांनी एकही षटकार लगावला नाही.
रॉय आणि आंद्रे रसेल यांनी मिळून सातव्या विकेटसाठी २३ धावांची भागीदारी केली. कुलदीप यादवने जेसन रॉयला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. जेसनने ४३ धावा केल्या, ज्यात पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. यानंतर कुलदीप यादवने पुढच्याच चेंडूवर अंकुल रॉयला (०) एलबीडब्ल्यू आऊट करून दिल्लीला आठवे यश मिळवून दिले. उमेश यादव (३) देखील नॉर्खियाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला, त्यामुळे धावसंख्या ९ विकेट्सवर ९६ धावा झाली. आंद्रे रसेल आणि वरुण चक्रवर्ती यांच्यात ३१ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे कोलकाताला १२७ धावांपर्यंत मजल मारता आली. रसेलने ३१ चेंडूंचा सामना करत नाबाद ३८ धावा केल्या, ज्यात चार षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता.
दिल्लीकडून कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया , इशांत शर्मा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.