( खेड / भरत निकम )
खेड तालुका कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळावा व रानभाजी प्रदर्शनाला आज खेड, दापोली व मंडणगड मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी उपस्थित राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषी विभागाने नारळाचे रोप भेट देऊन आमदार व इतर उपस्थित प्रतिनिधी यांचा सत्कार केला. तसेच या कार्यक्रमात रानभाजी प्रदर्शनात पारितोषिके मिळवलेल्या सर्व स्पर्धकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला व कोकणच्या निसर्गातील लयास जाणाऱ्या वेगवेगळ्या आणि निरनिराळ्या रानभाज्या अद्याप जतन करून पुढील पिढीपर्यंत नेण्याचे बहुमूल्य कार्य केल्याने असल्याबद्दल सर्व स्पर्धकांचे विशेष आभार आमदार योगेश कदम यांनी मानले.
या कार्यक्रमा दरम्यान भरडधान्य लागवड व त्याचा आहारातील उपयोग या विषयावर सहजीवन हायस्कूलच्या एका विद्यार्थिनीने अतिशय उत्तम प्रकारे सादर केलेल्या प्रेझेंटेशनला आमदार यांच्यासह उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी दाद दिली. या विद्यार्थिनीचाही यावेळी सन्मान करून तिचे कौतुक करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात खेड तालुका कृषी विभागाने गेल्या ३ वर्षात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. तसेच काही योजनांमध्ये खेड तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून आता राज्यस्तरावर सुद्धा खेड तालुक्याने बाजी मारावी यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित केले तसेच कृषी विभागातील योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजून मेहनत घ्यावी, असे आवाहन आमदार योगेश कदम यांनी केले.
यावेळी आमदार म्हणून कार्यरत असताना माझ्याकडून शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत व मार्गदर्शन केले जाईल असा शब्द उपस्थितांना आमदार कदम यांनी दिला. कोकणातील शेतकरी हा कर्ज बुडवा नसून कर्ज फेडणारा शेतकरी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील यावेळी दिली. या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी सभापती रामचंद्र आईनकर, शांताराम चिनकटे, युवराज गुजर आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो – खेड तालुका कृषी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांना सन्मानित करताना आमदार योगेश कदम व इतर दिसत आहेत.