(वेळणेश्वर / उमेश शिंदे)
महाराष्ट्रात मातीचा रंग बदलला की, तेथील सणांच्या परंपरा बदलतात, उत्सव बदलतात, प्रथा बदलतात, परंतु हे उत्सव आजही वैशिष्टयपूर्ण आहेत. गावागावांमध्ये ग्रामदेवतेला गाऱ्हाणे घालण्याचा आणि मर्दानी खेळ उघड्या पालखी बरोबर लोटण्या घेण्याचा हा या उत्सवामध्ये विशेष आकर्षण असते. गुहागर तालुक्यात होणारा भंडारी समाजाचा समा (लोटणी) उत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा वर्षानुवर्ष कायम आहे. आजही वर्षभरात पाच ते सहा गावांमध्ये हा उत्सव पारंपरिकरित्या देवीची पालखी घरोघरी फिरून झाल्यावर ग्रामदेवतेच्या साक्षीने पालखी समोर हा समा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव अगदी मे महिन्याच्या अखेर पर्यंत चालतो. काही गावांमध्ये तर पावसाळ्यात उगवणाऱ्या भाज्यांचा नैवैद्य खाल्ल्याशिवाय पालखी मंदिरात जात नाही, अशी प्रथा आहे.
समा उत्सवामध्ये प्रामुख्याने भंडारी समाजाला उत्सवा बदलची मोठी उत्सुकता असते. सन १८९० साली सुरू झालेला हा उत्सव म्हणजेच पालखी बरोबर लोटण्या घेण्याचा प्रकार श्रध्देने भारलेला असतो. तरीही चित्तथरारक, आव्हानात्मक, अंगावर शहारे आणणारा लोटण्या हा प्रकार आहे. १८९० पासून या उपक्रमात सुरुवात झाल्याचे वयोवृध्द सांगतात.
समाजासाठी समानता आणणारा उत्सव म्हणजे समाजाला एकत्र आणण्याचा संघटित करण्याचा उत्सव, समाजाला एकत्र आणण्यासाठी सुरू झालेली परंपरा आजही त्याच भावनेने सुरू आहे. प्रामुख्याने भंडारी समाज ज्या भागांमध्ये राहतो त्या ठिकाणी समा उत्सव साजरा केला जातो आणि येथील तरुण मंडळी आपली शक्ती पणाला लावत या खुल्या पालखीबरोबर लोटण्या घेतात. समाज या भावनेतून समाजाने मान्य केलेल्या उपक्रमात सहभागी होतात.
समा उत्सवाचे आयोजन पंचरस समाज, कुणबी समाज, खारवी समाज आपापल्या ठिकाणी करतो. देवीच्या पालखी प्रमाणे असणाऱ्या लाकडी उघड्या ( देवता नसलेली) पालखीला दोन्ही बाजू लोटण्याची स्पर्धा होते. ज्या गावात समा उत्सवाचे आयोजन केले जाते ते गाव इतर गावांना निमंत्रित करतो. या यजमान गावाशी इतर सहभागी गावातील तरुण मंडळी लोटण्या घेतात. यामध्ये प्रथम लोटणी घेणाऱ्याला भवानीचा मान असे म्हणतात.
हा उत्सव पहाटेपर्यंत भक्तिमय वातावरण व शांततेत पार पडतो हे या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य असते. शेवटी या उत्सवामध्ये सहभागी झालेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो. या उत्सवाचे एकत्रितरीत्या समाज असल्याने वाद विवाद होत नाही. बदलत्या काळात समा उत्सव मधील प्रमुख उद्देश पाठी पडत असला तरी आज धकाधकीच्या जीवनातही उत्सवासाठी सर्व लहानथोर मंडळी आजही त्याच तन्मयतेने व भक्तिभावाने उत्सवामध्ये सहभागी होऊन ही परंपरा जोपासत आहेत.
वेळणेश्वर भंडारी समाज ज्ञाती बांधव आयोजित १४ एप्रिल २०२३ रोजी समा उत्सवाचे आयोजन
वेळणेश्वर येथील भंडारी समाज ज्ञाती बांधव आयोजित १४ एप्रिल २०२३ रोजी ग्रामदेवता कालभैरवाचा समा उत्सव वेळणेश्वर सहाण येथे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वा. लॉटरी पद्धतीने हजर असलेल्या गावांचे नंबर काढले जातील. हजर नसलेल्या मंडळाचे नंबर उपस्थिती नुसार क्रमाने दिले जातील. रात्री ७.३० वाजता नंबर प्रमाणे पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल, रात्री १० वा. मुख्य लोटनीचा कार्यक्रम सुरू होईल, लोटणी कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर देवाचा महाप्रसाद होईल, तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भंडारी समाज ज्ञाती बांधव वेळणेश्वर यांनी केले आहे.