(संगमेश्वर / प्रतिनिधी)
आदर्श केंद्रशाळा शृंगारपूर या शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपासपेटी, पेन पेन्सिल, स्केचपेनबॉक्स आणि छत्र्या अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप, गांवातील म्हस्केवाडीच्या ‘नवविकास मित्र मंडळा’च्या वतीने करण्यात आले. सदर कार्यक्रम जि.प. आदर्श केंद्रशाळा शृंगारपूर या ठिकाणी संपन्न झाला.
एकाचवेळी विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपासपेटी, पेन पेन्सिल, स्केचपेनबॉक्स, छत्र्या आणि खाऊ मिळाल्यामुळे सर्व मुलं अत्यंत खूषीत दिसत होती. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी ओसंडून वाहत होता. कधी एकदा या सर्व वस्तूंचा आपल्याला वापर करता येईल याची सर्वच मुलांना घाई झालेली दिसली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबध्दल शाळेच्या वतीने, मुख्याध्यापक प्रमोद चिलेगुरुजी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विमलाकांतबुवा पवार, माजी अध्यक्ष मंगेश पवार यांनी म्हस्केवाडी मंडळाचे आभार व्यक्त केले,
यावेळी जगन्नाथ सुर्वे, विनोद म्हस्के यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या साहित्यांसाठी ज्या मान्यवरांनी सौजन्यरुपात आर्थिक सहकार्य केले होते, अशा सर्वश्री विनोद म्हस्के, विलास म्हस्के, जगन्नाथ सुर्वे, संजय चव्हाण आणि “पुरातन महादेव मंदीर शृंगारपूर”, यांच्याप्रती मंडळाच्या वतीने सल्लागार गजानन म्हस्के, मारुती म्हस्के यांनी कृतज्ञता व्यक्त करुन, सर्वांना मनापासून धन्यवाद दिले. तसेच पुढील वर्षी शृंगारपूर केंद्रशाळा कक्षेतील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना कश्याप्रकारे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येईल, असा त्यांनी मानस व्यक्त केला.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक चिलेगुरुजी, शिक्षकवृंद, शाळेच्या विविध समित्यांवरील पदाधिकारी, गांवच्या उपसरपंच सौ. श्यामल जाधव, माजी सरपंच श्रेया पवार, ग्रामपंचायत सदस्य दिपाली म्हस्के, निवेदिता सावंत, भैरीभवानी स़ेवा समितीचे जगन्नाथ सुर्वे, पोलिस पाटील राजेंद्र पांचाळ, विनोद म्हस्के दिपक म्हस्के, संजय म्हस्के, राजेंद्र म्हस्के, अशोक म्हस्के आणि गांवातील ग्रामस्थ, महिला मंडळ सौ प्राची म्हस्के, सौ सविता शा. म्हस्के, जयश्री स. म्हस्के, अर्चना चव्हाण, सौ विनया वि. म्हस्के, तसेच मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांनी उपस्थित राहून, या शैक्षणिक उपक्रमाची शोभा वाढवली.
उपस्थित सर्वांना मंडळाच्यावतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. म्हस्केवाडी मंडळाने राबविलेल्या या स्तुत्य अशा शैक्षणिक उपक्रमाबद्दल, या मंडळाचे सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.