(रत्नागिरी)
मंगळवारच्या पावसाने शीळ धरणातील पाणीसाठा 0.540 दशलक्ष घनमीटरवर पोहचला आहे. असाच पाऊस पुढील दोन दिवस जोरदारपणे कोसळला तर रत्नागिरी शहराचा पाणी पुरवठा नियमित करता येऊ शकेल, असे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
शहरात 21 मे पासून एकदिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाला. पावसाळा सुरू झाला तरी पावसाला जोर नव्हता. त्यामुळे धरणातील पाणीसाठा अपेक्षित वेगाने वाढत नव्हता.
21 मे रोजी 0.525 दशलक्ष घनमीटर इतका साठा होता. सोमवारपर्यंत हा साठा 0.487 दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचला. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्याचा संपूर्ण भार शीळ धरणावर येतो. पानवल धरणातील आणि नाचणे तलावातील पाणी फेब्रुवारी महिन्यात संपते. त्यामुळे शीळ धरणातील पाण्यावर शहरवासीयांची तहान भागवावी लागते.
चालू वर्षी रत्नागिरी नगर परिषदेने एमआयडीसीकडून पाणी घेणेही बंद केले. दरमहा 4 ते 5 लाख रुपये एमआयडीसीला पाणीपट्टीचे भरावे लागतात ते पैसे वाचले. परंतु पाणी पुरवठ्याचे प्रमाण वाढत गेले. यातून पाऊस लांबला तर पाण्यासाठी हाल होवू नयेत म्हणून रनपचे मुख्याधिकारी तुषार बाबर आणि पाणी पुरवठा विभागाचे अभियंता अविनाश भोईर यांनी एकदिवसआड पाणी पुरवठ्याचे नियोजन केले.