(रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयतीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी सलग दुसर्यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार ३० एप्रिलपर्यंत शाळा नोंदणीसह विद्यार्थ्यांना माहिती प्रपत्र, आवेदनपत्र सादर करण्याची संधी मिळणार आहे, तर २ मे नंतर शुल्क भरता येणार नाही असे परिषदेने पत्रकाद्वारे सांगितले आहे.
दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरतात. शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात गुणवत्ता यादीत येणार्या इयत्ता पाचवीच्या विद्याथ्यांना इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत दरमहा १०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते, तर आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे म्हणजेच दहावीपर्यंत दरमहा १५० रुपये शिष्यवृत्ती मिळते. दरम्यान, शिष्यवृत्ती परीक्षेचे आवेदनपत्र हे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
परीक्षेविषयी अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २० फेब्रुवारीला पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) निश्चित करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहेत.