( पाचल / वार्ताहर )
“छत्रपती शिवाजी महाराज हे खरेखुरे रयतेचे राजे होते. त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य प्रजेतल्या प्रत्येकाला आपले राज्य वाटत होते. त्यांनी अठरापगड जातींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. गुणवत्तेनुसार व कुवतीनुसार प्रत्येकाला सन्मान जनक काम दिले. त्यांचे धर्म सहिष्णुतेचे धोरण तर आजही आदर्शवत आहे. स्त्रियांचा सन्मान कसा करावा? याचा त्यांनी धडाच घालून दिला आहे. अशा जाणत्या राजाचे स्वराज्य विचार आज आचरणात आणण्याची गरज असून आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करूया “,असे आवाहन डॉ.ए. डी.पाटील यांनी केले.ते श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आयोजित शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य विचार ‘ या विषयावर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस डॉ.ए.डी. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पी.पी. राठोड यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पी. पी. राठोड यांनी तर आभार प्रा. एम.डी. देवरुखकर यांनी मानले.