[ रत्नागिरी/ प्रतिनिधी ]
रत्नागिरी शहरातील शिवाजी नगर परिसरात स्वच्छतेचा अभाव असून यामुळे ठिकठिकाणी नाल्या तुंबल्या आहेत. गटाराचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे यामुळे रत्नागिरी नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बहुतांश ठिकाणी नाल्या आहेत मात्र त्या अरुंद असल्यामुळे नाल्यात कचरा प्लॅस्टिक पिशव्या साठून नाले तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे नगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
ड्रेनेजलाइन चोकअप होऊन पाणी थेट रस्त्यावर येण्याच्या घटना वारंवार होत आहेत. वेळेत दुरुस्ती होत नसल्याने सांडपाणी आलेल्या भागात आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील सर्वच भागांत कमीअधिक प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे पाइप फुटल्याने तसेच ड्रेनेज लाइन तुंबल्याने पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याचे दृश्य दिसते. दुरुस्ती वेळेत होत नसल्याने त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होऊन आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. विशेषत: शहरातील जुन्या भागात जलवाहिनी फुटणे किंवा ड्रेनेजलाइन चोकअप होण्याचे प्रकार कायमपणे घडतात. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याचा प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. रविवारी (१२ मार्च २०२३) शिवाजी नगर परिसरात रिक्षा स्टँडजवळ ड्रेनेजलाइन चोकअप झाल्याने ड्रेनेजमधील दुर्गंधीयुक्त पाणी रिक्षा स्टँडपर्यंत पोहोचले. या घटनेची दखल घेऊन नगरपालिकेने गटारीची रूंदी वाढविने गरजेचे आहे. शिवाय परिसरातील कचराही गटारीत टाकल्याने पाणी साचण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे या परिसरात दुर्गंधीयुक्त पाणी निचरा होण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्या. अशी मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.