(रत्नागिरी/प्रतिनिधी)
रत्नागिरीत 10 जुलै रोजी शिवसेना मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला माजी मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, गद्दार आणि बंडखोरांना 10 रोजीच्या मेळाव्यात प्रवेश दिला जाणार नाही. शिवसेनेशी गद्दारी करत बाहेर गेलेल्या उदय सामंत, योगेश कदमांसह बंडखोर आमदारांना पुन्हा शिवसेनेत थारा दिला जाणार नाही. त्यांना शिवसैनिक म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकारच नाही, असे खासदार राऊत म्हणाले.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, सध्या भाजप घाणेरडे राजकारण करत आहे. शिवसेनेतून आज काही आमदार गेले असले तरी राहिलेल्या आमदारांना सोबत घेऊन पुन्हा नव्या जोमाने संघटना बांधण्याचे काम पक्षप्रमुखांनी हाती घेतले आहे. जे गेले त्यांना शिवसेनेची दारे यापुढे पूर्णत: बंद राहणार आहेत.
रत्नागिरीत 10 जुलैचा मेळावा शिवसेनेच्या निष्ठावंतांचा आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी आहे. आमदार राजन साळवींचा सत्कार हा त्यातील एक भाग आहे. या मेळाव्यात येण्याचा सामंतांना नैतिक अधिकार नाही. काही व्यावसायिक राजकारणी असतात त्यांना सत्तेची चिंता असते. यामुळे ते उड्या मारत असतात असेही त्यांनी म्हंटले आहे.