(मुंबई)
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेनेला ठाकरेंकडून कोणीच वेगळे करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली, तर ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांनाच पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले.
शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे पक्षाचे अधिकृत नाव व चिन्ह गोठवले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कौल देऊन निवडणूक आयोगाने सर्वांनाच धक्का दिला आहे. यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधकांनी देशाची लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप केला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे तो लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याची टीका केली. शिवसेनेला ठाकरेंपासून कोणीच वेगळे करू शकत नाही. शिवसेना आणि ठाकरे हे वेगळं समीकरण आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला असला तरी जनता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय देईल, असेही ते म्हणाले.
गद्दारी केली त्यांनाच नाव आणि चिन्ह : अजित पवार
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार टीका केली. हा निर्णय अनपेक्षित आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी संघटना स्थापन केली. महाराष्ट्रभर पक्ष वाढवला, सभा घेऊन पक्ष सगळीकडे वाढवला. स्वत: बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे पक्ष सांभाळतील, आदित्य ठाकरे काम करतील, असे सांगितले होते. पण आता ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले, अशी टीका अजित पवार यांनी केली. असा निकाल अनपेक्षित आहे. आगामी काळात महाराष्ट्रातील जनता ही उद्धव ठाकरे यांच्याच बाजून कौल देईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
देश कायद्याने चालणार की महाशक्तीच्या मर्जीने? : पटोले
एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार ज्या महाशक्तीच्या जीवावर पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळेल, असे सांगत होते ते अखेर प्रत्यक्षात आले आहे. त्यामुळे या देशातील स्वायत्त संस्था कायद्याने चालणार की महाशक्तीच्या मर्जीने असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाकरेंच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह तुम्ही चोरू शकता, पण त्यांना असणारा जनतेचा आशीर्वाद कसा काढून घेणार, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या बोटाला धरून महाराष्ट्रात वाढलेल्या भाजपने आज त्यांचा पक्ष संपवण्याचा कृतघ्नपणा केला आहे, असा आरोप केला.